नंदुरबारची मिरची पावडर व आमचूर पावडरला जीआय मानांकन
By मनोज शेलार | Published: April 14, 2024 05:53 PM2024-04-14T17:53:35+5:302024-04-14T17:53:47+5:30
नंदुरबार : नंदुरबारची प्रसिद्ध मिरची पावडर आणि सातपुड्यात तयार करण्यात येणारी आमचूर पावडर यांना जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. यामुळे या दोन्ही वस्तूंना जागतिक पातळीवर मान्यता मिळाली ...
नंदुरबार : नंदुरबारची प्रसिद्ध मिरची पावडर आणि सातपुड्यात तयार करण्यात येणारी आमचूर पावडर यांना जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. यामुळे या दोन्ही वस्तूंना जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात मिरचीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. दर हंगामात तीन ते साडेतीन लाख क्विंटल मिरची येथे खरेदी होते. त्यावर प्रक्रिया करून मिरची पावडर तयार केली जाते. त्यालाही देशभरात मागणी आहे. याशिवाय आंब्याच्या सिझनमध्ये सातपुड्यात विशेषत: धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात आमचूरचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. त्यापासून पावडरदेखील तयार केली जाते. त्यालाही परराज्यांत मोठी मागणी आहे.
या दोन्ही वस्तूंना जागतिक दर्जाच्या वस्तू म्हणून मान्यता मिळाव्या यासाठी जी.आय. मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न सुरू होता. त्याकरिता नाबार्ड, डॉ. हेडगेवार सेवा समिती आणि कृषी विज्ञान केंद्र यांनी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून, नुकतेच या दोन्ही वस्तूंना जी.आय. मानांकन मिळाले आहे. भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाअंतर्गत डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री ॲंड इंटर्नल ट्रेडने याबाबत अधिकृत माहिती प्रसिद्ध केल्याचे नाबार्ड, हेडगेवार संस्था व कृषी विज्ञान केंद्रातर्फे सांगण्यात आले.