लसीकरणानंतर बालिकेचा मृत्यू, कुटुंबीयांचा आक्रोश; शवविच्छेदनाचा अहवाल दोन दिवसात येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 02:10 PM2024-01-11T14:10:02+5:302024-01-11T14:11:41+5:30
लसीमुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांसह कुटुंबीयांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क, नंदुरबार: हळदाणी ता. नवापूर येथील आरोग्य उपकेेंद्रात लसीकरणानंतर काही तासात ३ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाला. लसीमुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांसह कुटुंबीयांनी केला. यामुळे आरोग्य विभागाने तीन महिन्याच्या बालिकेचे बुधवारी सकाळी शवविच्छेदन करून मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला. शवविच्छेदनाचा अहवाल दोन दिवसात जिल्हा बालमृत्यू अन्वेषण समितीला सादर होणार आहे.
गताडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हळदाणी उपकेंद्रात प्रियल प्रकाश गावित या बालिकेला नियमित पेंटा लस देण्यात आली होती. लसीकरणानंतर काही तासात बालिकेला श्वास घेण्यास अडचणी येत असल्याचे तिच्या पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.