नातेवाइकांना सोडायला जाणे आनंददायी; प्लॅटफाॅर्म तिकीट १० रुपये, झाले ना भाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:33 AM2021-09-18T04:33:34+5:302021-09-18T04:33:34+5:30
नंदुरबार : भारतीयांची जीवनवाहिनी असलेली रेल्वे पुन्हा वेग पकडत आहे. प्रवाशांची संख्या अधिक वाढावी यासाठी रेल्वेकडूनही कोरोनात लावलेले निर्बंध ...
नंदुरबार : भारतीयांची जीवनवाहिनी असलेली रेल्वे पुन्हा वेग पकडत आहे. प्रवाशांची संख्या अधिक वाढावी यासाठी रेल्वेकडूनही कोरोनात लावलेले निर्बंध कमी करण्यात येत आहेत. यातच प्लॅटफाॅर्म तिकिटाचे दर १० रुपयांवर आल्याने नातेवाइकांना सोडायला स्टेशनात जाणारा युवा वर्ग पुन्हा दिसून येत आहे.
घरी आलेल्या पै-पाहुण्यांना परत जाण्यासाठी घरातील युवकांचा मोठा आधार असतो. रेल्वेस्थानकात पोहोचवून देत तिकीट काढून गाडीचा फलाट तपासून तेथंपर्यंत नेऊन सोडणारा युवा वर्ग प्लॅटफाॅर्म दर वाढल्याने दिसून येत नव्हता; परंतु रेल्वे प्रशासनाने दर कमी केल्यानंतर नातलगांना सोडण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. यातून दर दिवशी प्लॅटफाॅर्म तिकिटांच्या विक्रीतून महसूल येण्यास प्रारंभ झाल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मे २०२० पासून रेल्वे वाहतूक सेवा बंद होती. काही काळाने ही सेवा सुरू करण्यात आल्यानंतर गर्दी रोखण्यासाठी विविध नियमावली तयार केल्या गेल्या. यातच प्लॅटफाॅर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले. एकापेक्षा अधिक जण नातलगांना सोडायला जाणे परवडत नसल्याने रेल्वेस्टेशनच्या बाहेरच नातेवाइकांना निरोप देण्यात येत होता. दुसरीकडे प्लॅटफाॅर्म तिकिटाचे दर वाढल्याने स्थानकातील गर्दी कमी झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने आरेाग्य तपासणी केली जात असल्याने नातेवाईक किंवा मित्रांना रेल्वेत सोडण्यासाठी येणारा युवा वर्ग दिसून येत नव्हता. नंदुरबार रेल्वेस्थानकात तब्बल एक वर्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करून अहवाल दिले जात होते.
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर रेल्वेस्थानकांवर गर्दी कमी झाली होती. संसर्गाच्या भीतीने अनेकजण येतच नव्हते.
प्लॅटफाॅर्म तिकीट ५० रुपयांवरून १० रुपये झाल्यानंतर मात्र स्थानकात पुन्हा वर्दळ वाढत आहे. पॅसेंजर गाडीत जाणाऱ्या प्रवाशांना सोडण्यासाठी त्यांचे नातलग येत आहेत.
सध्या दर दिवशी २०० च्या जवळपास प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री होत आहेत.
सुरू असलेल्या रेल्वे
n नवजीवन एक्स्प्रेस
n सुरत-भुसावळ पॅसेंजर
ताप्तीगंगा एक्स्प्रेस
ओखा-पुरी एक्स्प्रेस
रीवा एक्स्प्रेस
हावडा एक्स्प्रेस
प्रेरणा एक्स्प्रेस
उद्योकर्मी एक्स्प्रेस
खानदेश एक्स्प्रेस