धुरखेडा येथे बिबटय़ाच्या हल्ल्याने शेळी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 01:14 PM2018-08-26T13:14:48+5:302018-08-26T13:14:53+5:30
धुरखेडा रस्त्यावरील घटना : वनविभागाचे दुर्लक्ष, प्रकाशा ग्रामस्थांमध्ये भीती
प्रकाशा : धुरखेडा रस्त्यावर बिबटय़ाने शेळीवर हल्ला करून जखमी केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. दरम्यान, प्रकाशा गावाच्या परिसरात ठिकठिकाणी बिबटय़ा आढळून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. मात्र वनविभागाने बिबटय़ांच्या बंदोबस्ताकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
येथील रामनगरमधील रहिवासी शिवदास भाईदास भिल हे त्यांच्या मालकीच्या शेळ्या धुरखेडा रस्त्यावरील सचिन सखाराम चौधरी यांच्या शेताजवळ चारत होते. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास बिबटय़ाने एका शेळीवर हल्ला केल्याने मानेला जखम झाली. भिल यांनी शेळीला घरी आणून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश देशमुख यांच्याकडून औषधोपचार केला. मात्र मानेला जखम असल्याने शेळी चारा खात नसल्याचे शिवदास भिल यांनी सांगितले.
वैजाली रस्त्यावरील नवीन वसाहतीत सुरेश गोसावी यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. शनिवारी पहाटे ते बांधकामाच्या ठिकाणी जात असताना त्यांनाही बिबटय़ा आढळून आला. प्रकाशा-त:हावद रस्त्यावरही जे.के. पॅकेजिंग परिसरात चार ते पाच दिवसांपासून बिबटय़ा आढळून येत आहे. तेथेही एका शेळीवर बिबटय़ाने हल्ला केला असून पायाचे ठसेही आढळून आले. प्रकाशा-नांदरखेडा रस्त्यावर 10 दिवसांपासून प्रकाश हरी पाटील यांच्या शेतात बिबटय़ा आढळून येत असून रात्री गोमाई नदी किना:यावर फिरताना आढळून येतो. शेतशिवारातून बिबटय़ा आता गाव परिसरातही आढळून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. याबाबत वनविभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिका:यांनी लक्ष घालून बिबटय़ाच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.