फिरायला जाताहेत, सावधान.... निर्जन स्थळ बनले मद्यपींचे अड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:34 AM2021-09-23T04:34:26+5:302021-09-23T04:34:26+5:30
नंदुरबार : शहर व परिसरातील निर्जन स्थळे गुन्हेगारांचे अड्डे बनले असून, अशा ठिकाणी उघड्यावर बसून दारू पिणे, छेडछाड करणे, ...
नंदुरबार : शहर व परिसरातील निर्जन स्थळे गुन्हेगारांचे अड्डे बनले असून, अशा ठिकाणी उघड्यावर बसून दारू पिणे, छेडछाड करणे, भरधाव बाइक चालविणे असे प्रकार घडत आहेत. अशा ठिकाणी पेट्रोलिंग वाढविणे गरजेचे असून, कारवाईही गरजेची आहे.
शहराचा विस्तार वाढत आहे. अनेक भागांत नवीन वसाहती निर्माण झाल्या आहेत. लांबवरच्या अशा वसाहतींमध्ये जाण्यासाठी पालिकेने आपल्या हद्दीत चांगले रस्तेही तयार केले आहेत. आता तेच रस्ते गुन्हेगारांचे अड्डे बनत आहेत. काही ठिकाणी तर अवैध धंदेदेखील सुरू आहेत. उघड्यावर बसून दारू पिणे, भरधाव वाहने चालविणे, सकाळी किंवा सायंकाळी फिरण्यास निघालेल्या महिला, मुली यांच्याबाबत शेरेबाजी करणे, त्यांना वाहनांचा कट मारणे असे प्रकार वाढले आहेत. त्यासाठी कारवाई गरजेची आहे.
शहरालगतच्या रस्त्यांवर रात्री फिरणेही धोक्याचे...
शहरातील काही ठिकाणी पायी फिरणेही घातक ठरत आहे. ज्या भागात रहिवासी वस्ती कमी आहे; परंतु अशा ठिकाणी जाण्यासाठी पक्के रस्ते आहेत, अशा रस्त्यांवर सायंकाळी पायी फिरणे धोक्याचे आहे. कारण, अशा रस्त्यांवर सन्नाटा आणि अंधाराचा फायदा घेत अनेक मद्यपी मद्य रिचवत असतात. सामसूम रस्ते पाहून अनेक जण भरधाव दुचाकी चालवत असतात. यामुळे मात्र अशा भागात जाण्यासाठी महिला, मुलींना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. त्यामुळे अशा भागात पेट्रोलिंग वाढवावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
विविध जागा बनल्या मिनीबार
सायंकाळ झाली की, शहरातील काही भागांना व सामसूम असलेल्या चौकांना मिनीबारचे स्वरूप येते. दोंडाईचा रस्त्यावरील मिरची पथारी, होळ शिवारातील मोकळ्या जागा, वाघोदा शिवार, टोकरतलाव शिवारातील जागांवर, टेकडींवर मद्यपी छानपैकी बैठक मारतात. दुसऱ्या दिवशी अशा ठिकाणी मद्याच्या, पाण्याच्या बाटल्यांचा खच दिसून येतो. अशीच स्थिती ही बाजारातील विविध चौकांतील सोडावॉटरच्या लॉरी, अंडापावची लॅारी अशा ठिकाणी मद्यपींना सोय केली जाते. भरचौकात हे सर्व सुरू असतानाही त्याकडे पोलिसांकडून कानाडोळा केला जातो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणची शांतता व सुव्यवस्थादेखील एखाद्यावेळी धोक्यात येऊ शकते.
नियमित होते पोलिसांकडून तपासणी
शहरात मोकळ्या जागा, सामसूम रस्ते, नवीन वसाहतींची रस्ते, घरे अशी ठिकाणी मद्य पिणे, भरधाव वाहने चालविणे असे प्रकार होत असले, तरी सुदैवाने लुटमारीच्या घटना घडलेल्या नाहीत. यापूर्वी धूमस्टाइल सोनपोत लंपास करण्याचे प्रकार घडले होते. आता ते प्रकारही घडलेले नाहीत. त्याला कारण पोलिसांची नियमित तपासणी व अशा संशयित आरोपींवर असलेले लक्ष, त्यामुळे लुटमारीच्या घटनांची संख्या शहरात फारच कमी आहे.
फिरायला जाताय...काळजी घ्या...
सकाळी किंवा सायंकाळी फिरायला जाताना किमती दागिने घालून जाऊ नये. एकट्यानेदेखील जाणे टाळावे. सोबत एक किंवा दोन जण राहू द्यावे. चालताना मोबाइल कानाला लावून बोलू नये; परंतु मोबाइल जवळ असू द्यावा. रहदारीच्या रस्त्यावर चालताना एका बाजूला चालावे, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. ज्या भागात विरळ वस्ती आहे, त्या भागातील नागरिकांनी दोन, तीन जण मिळून सीसीटीव्ही लावावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.