सुवर्ण महोत्सवी वाटचालीत गतवैभवाचा संकल्प हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 12:07 IST2019-09-14T12:07:22+5:302019-09-14T12:07:31+5:30

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :महाराष्ट्रात सहकार चळवळीला ज्यांनी ख:या अर्थाने मजबुती दिली ते स्व.पी.के. अण्णा पाटील ...

The Golden Jubilee should have the resolve of the past | सुवर्ण महोत्सवी वाटचालीत गतवैभवाचा संकल्प हवा

सुवर्ण महोत्सवी वाटचालीत गतवैभवाचा संकल्प हवा

रमाकांत पाटील । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :महाराष्ट्रात सहकार चळवळीला ज्यांनी ख:या अर्थाने मजबुती दिली ते स्व.पी.के. अण्णा पाटील यांनी स्थापन केलेला सातपुडा सहकारी साखर कारखाना 50 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या 50 वर्षाच्या कार्यकाळात या कारखान्याने केवळ उद्योग म्हणून वाटचाल केली नाही तर परिसरातील विकास आणि लोकांचे हित याला प्राधान्य देत एक             अनोख्या सहकार चळवळीची बांधणी केली. शिक्षण, जलसंधारण, पर्यावरण, कृषी विकास, रोजगार या पंचसूत्रीच्या मार्गावर समाजाची बांधणी केली. त्यामुळेच शहादा परिसराचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोप:यात पोहोचले. म्हणून या कारखान्याचा सुवर्ण महोत्सवाला एक अनोख्या लोकचळवळीची झालर असल्याने त्याला वेगळे महत्त्व           आहे. 
स्वतंत्र महाराष्ट्र स्थापनेनंतर यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सहकार चळवळ अधिक मजबुत करण्याचा प्रय} झाला. त्याच काळात पी.के.अण्णा पाटील यांनी परिसरातील शेतक:यांच्या हिताचा विचार करून शहादा परिसरात सातपुडा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. 1 जानेवारी 1969 ला त्याची पहिली सभा झाली. त्यानंतर गावो-गावी सभा घेवून भाग भांडवल उभे केले. अवघ्या आठ महिन्यात साखर कारखान्याची महाराष्ट्रकडे सहकार कायद्याद्वारे नोंदणी केली. त्यासाठी अनेक अडथळ्यांची शर्यत त्यांनी पार केली. कारखाना नोंदणी नंतर अवघ्या अडीच वर्षात कारखाना उभारला आणि 18 डिसेंबर 1972 ला कारखान्याचा पहिला गळीत हंगाम सुरू झाला. पुढे या कारखान्याची नोंद केंद्रीय कायद्यान्वये झाली. सुरूवातीला अडीच हजार मेट्रिक टन गाळप क्षमता असलेला हा कारखाना टप्प्या टप्प्याने पाच हजार मेट्रीक टन क्षमतेचा झाला.
या कारखान्याचा उभारणीच्या वेळीच स्व.पी.के.अण्णा पाटील यांनी विकासाचे एक वेगळे स्वप्न पाहिले होते. ते साकार करण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेत अल्पकाळातच या कारखान्याला एका वेगळ्या उंचीला नेऊन ठेवला होता. हे कार्य करीत असतांना त्यांनी रोज 18 ते 20 तास काम केले. कामाचे त्यांना एक विलक्षण वेड होते. आजच्या पिढीला विश्वास बसणार नाही पण त्या काळात पी.के.अण्णा पाटील यांचा लोकांसाठी भेटीचा वेळ पहाटे पाच ते सात होता. त्यानंतर रात्री 11 र्पयत त्यांचे निरंतर काम सुरू असे. एक झपाटलेले नेतृत्व या कारखान्याला लाभल्याने स्थापने नंतर दोन दशके हा कारखाना उभ्या महाराष्ट्राला प्रेरणादायी ठरला. कुठलीही सत्ता नसतांना केवळ परिसरातील शेतकरी आणि जनतेच्या विश्वासावर पी.के.अण्णा पाटील यांनी उभारलेल्या या कार्याचा गौरव सर्वत्र होऊ लागला. कारखान्याच्या बळावरच परिसरात मोठी शिक्षण संस्था उभी राहिली. त्यामुळे आज परिसरातील उच्च शिक्षितांचे प्रमाणही वाढले आहे. शेतीतील नवनवे प्रयोग, नवीन तंत्रज्ञानाचा वापर याच परिसरात सुरू झाला. व्यवसाय रोजगार वाढले. जनजागृती झाली. परिणामी परिसराचा चेहराच बदलला. 
पाण्याच्या नियोजनासाठी तापीवरील उपसा योजना राबविण्यासाठी कारखान्याने पुढाकार घेतला. एवढेच नाही तर नर्मदा आणि तापीतील पाणी वापराचे सूत्र मांडले. तापीतील वाहून जाणारे पाणी महाराष्ट्राला कसे वापरता येईल त्याचे कारखान्याच्या अभियंत्यांनीच विद्यमान कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सव्रेक्षण करून एक आराखडा तयार केला. हा आराखडा महाराष्ट्र शासनाने जसाचा तसा स्विकारून तापी विकास खोरे मंडळाची स्थापना केली. नर्मदेचा 11 टीएमसी पाणी महाराष्ट्राला अर्थात नंदुरबार जिल्ह्यात कसे वापरता येईल याचे सरकार दरबारी सूत्र मांडले. त्यातूनच राज्यशासनाने सव्रेक्षण करूण नर्मदा वळण योजनेचा आराखडाही तयार केला आहे. एकीकडे नदीतील पाण्याचे नियोजन करीत असतांना कारखाना परिसरात 500 एकर क्षेत्रात या कारखान्याने जलसंधारणाचे अभिनव प्रयोग केले आहेत. या प्रयोगाने शहादा शहरातील टंचाईच्या काळात तहाण भागविली. भूमिहीन, शेतमजूर, ऊस तोड कामगार यांच्या हितासाठीही कारखान्याने अनेक योजना राबविल्या आहेत. एकूणच या कारखान्याची वाटचाल पाहिल्यास हा कारखाना केवळ उद्योग म्हणून नव्हे तर परिसरातील विकासाचे केंद्र बिंदू बनला.
केवळ उसापासून साखर निर्मिती न करता इतरही अनेक उपप्रकल्पांची उभारणी या कारखान्याने केली. पण सर्वकाही सुरू असतांना काही तांत्रिक अडचणी, ऊस टंचाईचा यासह अन्य कारणांचा फटका कारखान्यालाही बसला. त्यामुळे मध्यंतरी सन 2000 ते 2005 हे पाच वर्षे हा कारखाना बंद पडला. त्या वेळी हा कारखाना पुन्हा सुरू होणार नाही असा सूर काही लोक व्यक्त करीत होते. पण सर्व संकटांवर मात करीत अखेर हा कारखाना पुन्हा उभा राहिला. अनेक अडचणी असतांना सभासदांचा व परिसरातील जनतेच्या विश्वासावर हा कारखाना सुरू झाला. संकट कितीही मोठे असो पण लोकांचा विश्वास आणि साथ असली तर त्यावर मात करता येते  असा पुन्हा एक नवा आदर्श या कारखान्याने साखर उद्योग क्षेत्रात निर्माण केला.
आज पी.के.अण्णा नंतर त्यांचे पूत्र दीपक पाटील हे या कारखान्याचे नेतृत्व करीत आहेत. बंद कारखाना सुरू करून त्याला नवी दिशा देण्याचे काम त्यांच्याच नेतृत्वाखाली झाले आणि गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. एक-एक संकटाचा टप्पा पार करीत ते या कारखान्याला पुन्हा गत वैभवाच्या दिशेने नेण्याचे काम         करीत आहेत. राज्यातील इतर कारखान्यांना ऊस टंचाईचे संकट असतांना सातपुडा साखर कारखाना आपला गाळप हंगाम यशस्वी करीत आहे. गाळपाचे प्रमाणही दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे पुन्हा नवी उभारी व चैतन्य या परिसरात आले आहे. भविष्याची वाटचाल आज संघर्षमय वाटत असली तरी या कारखान्याचा इतिहास पाहिल्यास संघर्षातूनच आपले सुवर्ण पान लिहिले आहे. त्यामुळे सुवर्ण महोत्सव साजरा करतांना पुन्हा एकदा गत वैभव आणण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. हा संकल्प केवळ कारखान्याचे संचालक, कर्मचारी आणि  सभासदांनी नव्हे तर परिसरातील सर्वानीच करण्याची गरज आहे. कारण या परिसरातील समृद्धी आणि विकासाचे भविष्य कारखान्याच्या भविष्यावरच अवलंबून राहणार    आहे.
 

Web Title: The Golden Jubilee should have the resolve of the past

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.