अवैध दारू पकडल्याच्या कारवाईत धडगाव पोलिसांकडून गोलमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:36 AM2021-09-15T04:36:00+5:302021-09-15T04:36:00+5:30
सोमवारी पहाटेच्या चोंदवाडे परिसरात पोलिसांनी अवैध मद्याचे बाॅक्स वाहून नेणारा ट्रक ताब्यात घेतला होता. या कारवाईत १०० दारूचे बॉक्स ...
सोमवारी पहाटेच्या चोंदवाडे परिसरात पोलिसांनी अवैध मद्याचे बाॅक्स वाहून नेणारा ट्रक ताब्यात घेतला होता. या कारवाईत १०० दारूचे बॉक्स पकडून मुद्देमाल जप्त करत मालसिंग उताऱ्या पाडवी व मंगल हिंमतसिंग पावरा यांच्यावर गुन्हा दाखल केला; परंतु या वाहनात १०० नव्हे, तर २०० अवैध दारूचे बाॅक्स असल्याचा दावा करण्यात आला आहे. घटनास्थळी कारवाई सुरू असताना एक पोलीस कर्मचारी व संशयित आरोपी यांचा संवाद असणारी ऑडिओ क्लिप धडगाव तालुक्यातून जिल्हाभरात व्हायरल झाली आहे. या क्लिपकध्ये १०० ऐवजी २०० दारूचे बाॅक्स असल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वी ज्याचा माल आहे ती व्यक्ती आणि धडगाव पोलीस ठाण्याचा तो कर्मचारी गुन्हा कोणावर दाखल करायचा? २०० मधील शंभर पेटी परत करा, गुन्ह्यात १०० पेटीच दाखवा, असे संभाषण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून घटनास्थळी नेमका किती माल होता व किती माल सोडून देण्यात आला यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यामुळे १०० बॉक्स गेले कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. धडगाव पोलीस ठाण्याचा तो कर्मचारी कोण अन् त्याच्यासोबत बोलणारा मद्यसम्राट नेमका कोण, असाही प्रश्न आहे.
याबाबत धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांना संपर्क केला असता, ऑडिओ क्लिप खोटी असल्याचे त्यांनी सांगितले.