कोरोनामुळे आई-वडील गमाविलेल्या जिल्ह्यात सात बालकांना शासनाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:33 AM2021-09-18T04:33:07+5:302021-09-18T04:33:07+5:30

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील एकूण ९५० जणांचा बळी गेला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेले काही जण हे घरातील ...

Government support to seven children in the district who lost their parents due to corona | कोरोनामुळे आई-वडील गमाविलेल्या जिल्ह्यात सात बालकांना शासनाचा आधार

कोरोनामुळे आई-वडील गमाविलेल्या जिल्ह्यात सात बालकांना शासनाचा आधार

Next

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील एकूण ९५० जणांचा बळी गेला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेले काही जण हे घरातील कर्ते होते. त्यांच्या अचानक निधनाने त्यांचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. अशा कुटुंबांना आधार देण्यासाठी शासनाकडून विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ देण्यासाठी तालुकास्तरावर पाठपुरावा सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात कोरोनामुळे ९५० जणांचा मृत्यू झाल्याच्या नोंदी आहेत. शासनाच्या पोर्टलवर नोंदणी झालेल्या मयतांची माहिती संकलित करून महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडून गेल्या दोन महिन्यांपूर्वी सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. याअंतर्गत एकूण १३३ कुटुंबांना शासनाच्या योजनांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले होते. या कुटुंबांमधील २३३ मुले-मुली हे १८ वर्षाआतील आहेत. त्यांनी आई किंवा वडील गमावले आहेत. या विद्यार्थ्यांना बालसंगोपन योजनेंतर्गत १ हजार १०० रुपयांची मदत देण्याची प्रक्रिया होणार आहे. सोबत यातील तीन लाख रुपयांपेक्षा अधिक फी असलेल्या मुला-मुलींचा तीन वर्षांपर्यंतचा शैक्षणिक खर्च मुंबई येथील दोन सेवाभावी संस्था करणार आहेत. यातील २१ जणांची फी जमा करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे.

पती गमाविलेल्या ३६८ महिलांचे सर्वेक्षण महिला बालविकास विभागाने केले आहे. या महिलांना संजय गांधी निराधार, श्रावण बाळ यांसह विविध निराधार योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. शिबिरात अर्ज भरून झालेल्या महिलांचे अर्ज तालुकास्तरावर पाठविण्यात आले असून अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या महिलांनाही मासिक लाभ दिला जाणार आहे.

कोरोनामुळे दोन्ही पालक गमाविलेल्या मुलांची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे चित्र सध्या तरी आहे. आई-वडिलांचे छत्र अवघ्या काही काळातच हरविल्यानंतर सैरभैर बनलेल्या बालकांना आधार देण्यासाठी शासनाकडून पाच लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली होती. ही रक्कम संबंधित लाभार्थी बालक व महिला बालविकास अधिकारी यांच्या संयुक्त बँक खात्यात ठेवली जाणार आहे. जिल्ह्यात नवापूर व धडगाव येथे प्रत्येकी एक, तर नंदुरबार तालुक्यात तब्बल ५ बालकांचे आई-वडील कोरोनाने बळी गेले आहेत. ही मुले सध्या मामा, मावशी, काका-काकू तसेच इतर जवळच्या नातेवाईकांकडे आहेत.

Web Title: Government support to seven children in the district who lost their parents due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.