कुटूंबाने मतदान केल्यास घर व पाणीपट्टीत ग्रामपंचायत देणार सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:19 PM2019-10-19T12:19:45+5:302019-10-19T12:23:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणूकीत संपूर्ण प्रत्येक कुटूंबांने 100 टक्के मतदान केल्यास त्यांची घर आणि पाणीपट्टीसह इतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विधानसभा निवडणूकीत संपूर्ण प्रत्येक कुटूंबांने 100 टक्के मतदान केल्यास त्यांची घर आणि पाणीपट्टीसह इतर करांमध्ये 10 टक्के सूट देण्याचा निर्णय कुकावल ता़ शहादा ग्रामपंचायतीने घेतला आह़े ग्रामपंचायतीने याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली असून त्यांच्या या निर्णयामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त होत आही़े
प्रत्येक नागरिकाने मतदान करावे यासाठी शासनाकडून जाहिरातबाजी आणि जनजागृती करण्यात येत आह़े यात स्थानिक स्वराज्य संस्थांकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत़ यात नाविन्यपूर्ण असा निर्णय घेण्याचा मान यंदा शहादा तालुक्यातील कुकावल ग्रामपंचायतीने पटकावला असून एका घरातील सर्वच सदस्यांनी मतदान केल्यास त्यांना करात 10 टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े दोन हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या कुकावल गावच्या सरपंच वैष्णवी सनेर यांनी हा निर्णय जाहिर केला असून निर्णयाची प्रत्येकाला माहिती व्हावी यासाठी ग्रामपंचायतीने पारंपरिक ‘दंवडी’ दिली होती़ ग्रामपंचायतीने प्रत्येक घर आणि गल्लीत दवंडी देऊन याबाबत जनजागृती केली आह़े
निव्वळ मतदानापुरतेच मर्यादित न राहता ग्रामपंचायतीने शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत सक्रीय सहभाग नोंदवला होता़ गावातील एका कुटूंबाने 2019 आणि 2020 या वर्षात किमान पाच वृक्षांची लागवड करुन योग्य पद्धतीने संगोपन केल्यास संबधितांची घरपट्टी, पाणी पट्टी 100 टक्के माफ करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आह़े या उपक्रमासही ग्रामस्थ प्रतिसाद देत असल्याने मतदान संदर्भात केलेल्या घोषणेचेही चांगले फलित मिळून संपूर्ण गावाची 100 टक्के मतदान करणारे गाव अशी ओळख निर्माण होईल अशी अपेक्षा ग्रामपंचायत सरपंच वैष्णवी सनेर यांनी व्यक्त केली आह़े या उपक्रमामुळे हे गाव सध्या जिल्ह्यात चर्चेत आले आह़े