दहावीची परीक्षा देण्यासाठी आजोबा-आजी गुजरातमधून थेट नवापुरात; या वयात परीक्षा देण्याची गरज का? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 03:43 PM2023-03-03T15:43:48+5:302023-03-03T15:45:53+5:30
यंदाचे पहिले वर्ष नसून दरवर्षी गुजरात राज्यातील मंडळी दहावी बोर्डाचे पेपर देण्यासाठी नवापूरला येत असतात.
रमाकांत पाटील -
नंदुरबार : शिक्षणासाठी तुमचे वय नाही तर लागते ती जिद्द आणि चिकाटी. गुजरात राज्यातील 38 शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांना वेतनवाढ व पेंशन वाढण्यासाठी वयाचा 60,65,70 वयात दहावीचा गुजराती पेपर देण्यासाठी महाराष्ट्र राज्यात येऊन परिक्षा देण्याची वेळ आली आहे. यंदाचे पहिले वर्ष नसून दरवर्षी गुजरात राज्यातील मंडळी दहावी बोर्डाचे पेपर देण्यासाठी नवापूरला येत असतात.
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहर महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात असल्याने या ठिकाणी दहावीचा पहिला पेपर असून मराठी उर्दू आणि गुजराती तीन माध्यमांची परीक्षा आज घेण्यात आली आहे.
17 नंबरचा फॉर्म भरून 70 वर्षाचे विद्यार्थी गुजराती पेपर देण्यासाठी गुजरातहून महाराष्ट्रातील नवापूर परीक्षा केंद्रावर गुजराती पेपर देत आहे.गुजराती पेपर देण्यासाठी चक्क गुजरात राज्यातून शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक 60,65,70 वयाचे विद्यार्थी परीक्षेला बसले आहे.तुम्ही चकित झाला असेल ना 70 वयातील विद्यार्थी दहावीचा पेपर का देत आहे.
त्याचं कारण आहे की त्यांना पदोन्नती, वेतनवाढ पेन्शनसाठी मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या गुजरात राज्यात नोकरी करणारे शिक्षकांना दहावीचा गुजराती विषय हा गुजरात सरकारने सक्तीचा केल्याने 38 परीक्षार्थी शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक पदोन्नतीसाठी वेतन निश्चितीसाठी गुजराती भाषेचा पेपर लिहिण्यासाठी परीक्षा देताना दिसून येत आहे. या वयात दहावीचा पेपर देण्यासाठी त्यांना चक्क गुजरात राज्यातून 100 किलोमीटर अंतरावरून महाराष्ट्र राज्यात परीक्षा देण्यासाठी यावे लागत आहे.सार्वजनिक गुजराती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मराठी माध्यमाचे 281, उर्दू माध्यमाचे 50, गुजराती माध्यमाचे 278 विद्यार्थी परिक्षेत बसले आहेत. यात 38 विद्यार्थी गुजरात राज्यातील आहेत.
नवापूर तालुक्यातील नवापूर चिंचपाडा विसरवाडी खांडबारा पानबारा, वडफळी, निजामपूर सहा केंद्र असून एकूण दहावीला 3 हजार 562 विद्यार्थी परिक्षेला बसले आहेत. मराठी गुजराती उर्दू माध्यमांचा समावेश आहे. दरवर्षी गुजरात राज्यातून विद्यार्थी गुजराती पेपर देण्यासाठी नवापूरला येत असून पास झाल्यानंतर त्यांचा नोकरी मधला वेतन वाढी व पेन्शन वाढीचा अडसर दूर होता. त्यामुळे नवापूर शहरात दहावीचे परीक्षा देण्यासाठी गुजरात राज्यातील मोठ्या संख्येने शिक्षक मंडळी येताना दिसून येते.
महाराष्ट्र राज्यात मराठी माध्यमाची दहावी बोर्डाची परीक्षा देऊन शिक्षक म्हणून नोकरी करत असलेले शिक्षकांना गुजरात सरकारने गुजराती विषय सक्तीचा केला आहे. त्यांना महाराष्ट्र राज्यातूनच गुजराती विषयाचा पेपर देऊन उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातच गुजराती विषयाचा पेपर देणे बंधनकारक असल्याने नवापूरला दरवर्षी गुजरात राज्यातील शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक येत असतात. गुजराती विषय नसलेले शिक्षकांना वेतनवाढ व पेन्शनसाठी अडचणी येत असल्याने दहावीचा गुजराती पेपर नवापूरला परिक्षा देतात. नवापूरला गुजराती माध्यमची शाळा असल्याने या ठिकाणी त्यांना पेपर देणे सोयीचे होते. अन्यथा एक विषय देण्यासाठी बोर्डात जावे लागते.