कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:28 AM2021-01-18T04:28:34+5:302021-01-18T04:28:34+5:30
शहादा तालुक्यात सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या आढळून आली होती. जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू तालुक्यातच झाला होता. दरम्यानच्या काळात ...
शहादा तालुक्यात सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या आढळून आली होती. जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू तालुक्यातच झाला होता. दरम्यानच्या काळात प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने, तसेच उपाययोजनांची त्यात भर पडल्याने गेले तीन महिने रुग्णसंख्या नगण्य झाली होती, परंतु गेल्या महिन्याभरापासून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढत असून, ती चिंतेची बाब ठरत आहे. तालुक्यातील कलमाडी, तऱ्हाडी, जावदा आदी गावांमध्ये रुग्ण संख्या वाढत आहे. आरोग्य यंत्रणा गावात पथकामार्फत सर्वे करून कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग, तसेच हायरिस्क कॉन्टॅक्ट तपासणीवर भर असला, तरी नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करणे गरजेचे आहे.
शहादा तालुक्यात अचानक एवढी रुग्ण संख्या वाढीचे नेमके कारण काय? कोरोनाचा नवीन ट्रेंड तर नाही ना? याचा शोध आरोग्य यंत्रणेने घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे तालुक्यात परदेशवारी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, तसेच नाशिक, मुंबई, पुणे या मोठ्या शहरांशी नियमित संपर्क, तसेच ये-जा सुरू असते, याचाही शोध आरोग्य यंत्रणेने घ्यावा. बाहेरून आलेल्यांची तपासणी करून आवश्यक वाटल्यास विलगीकरणाच्या सूचना देणे गरजेचे आहे. रविवारी सकाळी बिलाडी त.सा. व बामखेडा या ठिकाणी चार ते पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने, प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरसे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र वळवी या अधिकाऱ्यांनी दोन्ही गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. सोमवारी या दोन्ही गावांत आरोग्य पथकामार्फत सर्वेक्षण करून तत्काळ उपाययोजना करण्याचे प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांनी सांगितले.
शहरासह ग्रामीण भागात कोरोना संसर्गजन्य रुग्णांची वाढती संख्या बघता, नागरिकांनी शासकीय नियमावलीनुसार सामाजिक उपक्रम राबवायचे आहेत. आरोग्याची काळजी घेत, मास्क लावून सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे. धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रम करताना, शासनाच्या नियमांचे पालन केल्यास कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत होणार आहे.