नंदुरबारमध्ये गटशेतीमुळे पारंपरिक वाणांच्या संगोपनाला आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2017 12:04 PM2017-09-04T12:04:43+5:302017-09-04T12:05:52+5:30
देशी तूर आणि पारंपरिक भात पिक यासाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबारमधील नवापूर तालुक्यात गेल्या 20 वर्षात गटशेतीमुळे शेतक-यांना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. यामुळे शेती गटांनी आता पारंपरिक वाणांच्या सवंर्धनाची जोड देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
भूषण रामराजे/नंदुरबार, दि. 4 - देशी तूर आणि पारंपरिक भात पीक यासाठी प्रसिद्ध असलेल्या नवापूर तालुक्यात गेल्या 20 वर्षात गटशेतीमुळे शेतक-यांना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. यामुळे शेती गटांनी आता पारंपरिक वाणांच्या सवंर्धनाची जोड देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एकूण ४६ हजार ४९३ हेक्टर शेतीक्षेत्र असलेल्या नवापूर तालुक्यात शेतीसिंचनाच्या खूप मोठ्या सोयी नसल्याने तरी हाती असलेल्या पाण्याच्या बळावर शेतक-यांनी गत २० वर्षात शेतीक्षेत्रात भरारी घेतली आहे. वर्षाला सरासरी १ हजार १२२ मिलीमीटर पावसाची नोंद होणा-या या तालुक्यात गेल्या तीन वर्षात दुष्काळी स्थिती होती. यामुळे पावसाचे पाणी आणि लघु-मध्यम प्रकल्पांचा जलसाठा यांचा वापर करत येथील शेतकरी गटांनी यापुढे दरवर्षी काही हेक्टर क्षेत्र भात किंवा इतर जुन्या आणि पारंपरिक वाणांची पेरणी करून संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे़ तालुक्यातील ७० गट सध्या पाच हेक्टरवर विविध पिके घेतात़ यात आता पारंपरिक वाणांची भर पडल्याने सकस उत्पादनाची हमी देण्यात येत आहे़ विशेष म्हणजे येथे आधीच प्रत्येक गट दरवर्षाला साधारण चार ते सात टन देशी तूरीचे उत्पादन घेतो़
अशी आहे गटशेती
४नवापूर तालुक्यातील धनराट, धुळीपाडा, जामतलाव, विजापूर, सावरट, तिळासर, गडद, खेकडा, बोकळझर, चौकी, नवापाडा आणि रायपूर या १२ गावांमध्ये १९९७ पासून बळीराजा कृषक मंडळ सुरू करण्यात आले आहे़ गटशेतीसाठी असलेल्या या मंडळात ५० सभासद आहे़ या मंडळाकडे आज ५० हेक्टर जमीन आहे़ एकत्रितरित्या होणा-या या गटशेतीत यंदा ऊस, मका, सोयाबीन, तूर, भात, उडीद, मूग, राळा आणि नागली या पिकांची पेरणी करण्यात आली आहे़
४२० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या गटाने देशी तूरच्या उत्पादनात कायम आघाडी घेतली आहे़ गटाने गेल्या हंगामात चार टन तूर उत्पादन केले होते़ ही संपूर्णपणे सेंद्रीय असलेली देशी तूर होती़ एकत्रितरित्या पेरणी, शेतमशागत, शेतीकामे करत असताना एक विचार यावा, यासाठी औजारे आणि खतांची बँकही या गटशेतीत निर्माण करण्यात आली आहे़ उत्पादनाची मिळकत ही सर्वांसाठी सारखीच असल्याने शेतक-यांनी एकता आजवर अबाधित आहे़ या गटाने येत्या काळात देशी तूर आणि भाताचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत़
भाताच्या संवर्धनासाठी पुढाकार
नवापूर तालुक्यात दरवर्षी १४ हजार हेक्टर भाताची पेरणी करण्यात येते़ नंदुरबार जिल्ह्यात उत्पादित होणारा ७५ टक्के भात हा याच तालुक्यातून जातो़ पेरा आणि लावणी अशा दोन पद्धतीतून येणारा भात हा उत्पादनातही सरस असाच आहे़ एका एकरात एक लाख ४४ हजार रोपांची लावणी करण्याची प्रक्रिया याठिकाणी पावसाळ्यात नजरेस पडते़ तालुक्यात चिखलणी पद्धतीने भाताचे शेत तयार केले जाते़ गेल्या पाच वर्षात पाऊस अनियमित असूनही तालुक्यात गटशेतीच्या माध्यमातून भाताची लावणी करून त्याचे उत्पादन शेतक-यांनी वेळेवर घेतले आहे़
दरवर्षी घेतल्या जाणा-या या उत्पादनात वाढ झाली असली तरी आता गटशेतीच्या माध्यमातून पारंपरिक काबरा डुला, साठी, चिरली, काळडांगर आणि बोवाट्या या वाणांचे संगोपन करण्यासाठी शेतकरी पुढे आले आहेत़ दरवर्षी गटशेतीतील पाच हेक्टर क्षेत्र या वाणांंना देऊन त्यांचे उत्पादन घेतले जात आहे़ पूर्णपणे कोरडक्षेत्रात येणारा हा तांदूळाचा वाण केवळ पावसाच्या पाण्यावर पिकवण्याचे अनोखे तंत्र शेतकरी वापरत आहेत. यात कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत वापरले जात नसल्याने या तांदूळाला सर्वाधिक मागणी आहे़
कृषी विज्ञान केंद्रांकडून सातत्याने मार्गदर्शन
नवापूर तालुक्यात फुललेल्या गटशेती चळवळीत कोळदा ता़ नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंंद्रानेही सातत्याने शेतक-यांनी मार्गदर्शन केले आहे़ नवापूर तालुक्यात यांत्रिक शेतीसाठी केंद्राने वेळोवळी पुढाकार घेतला आहे़ यात भात लावणी यंत्र विकसित करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही नवापूर तालुक्यात झाली होती़ गटशेतीला विज्ञान केंद्राने यांत्रिक शेतीची जोड दिली आहे़ यात गटांकडे विविध शेतीपूरक यंत्रांचीही उपलब्धता आहे़ तालुक्यात भात लागवड यंत्रामुळे अडीच हजार हेक्टर क्षेत्रात तांदूळाचे उत्पादन वाढले होते़ शेतक-यांना प्रात्यक्षिकाद्वारे दाखवून दिले गेल्याने त्यांचे यंत्रांविषयीचे गैरसमजही दूर झाले होते़
केंद्राचे विषयतज्ज्ञ जयंत उत्तरवार यांच्यासोबत चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, नवापूर तालुक्यात शेतक-यांनी रंगावली, नागण या मध्यम आणि मेंदीपाडा, विसरवाडी, देवळीपाडा, ढोंग, नेसू या लघु प्रकल्पांच्या पाण्याचा योग्य वापर करून गटशेती विकसित केली आहे़ यात भात आणि तूर या दोन पिकांना लागणाºया विविध यंत्रांची गटांनी खरेदी करून त्यांचा वार करत उत्पादनाला वेगळे वळण दिले आहे़ भाताची पारंपरिक लागवड यंत्रांच्या आधारे सुधारून त्यात पारंपरिक वाणांची जतन करणारा हा एकमेव तालुका आहे.
बळीराजा कृषक मंडळाने देशी तूरीच्या वाणाचे पेटंट मिळवले आहे़ तेथेच न थांबता आता त्यापुढे जाऊन पारंपरिक भाताच्या वाणांचे संवर्धन करून त्याचे उत्पादन कायम ठेवण्याचा शेतक-यांचा प्रयत्न आहे़ तालुक्यात पाण्याची स्थिती पाहून पिकांची होणारी पेरणी आणि त्याच प्रकारे होणारे संवर्धन यामुळे उत्पादनात वाढ होत आहे़ गटशेतीसाठी एकविचार करून शेतकरी एकत्र येतात, चर्चा करतात, विचार मांडून तो अंमलात आणतात. यापुढेही असे कार्य सुरू राहणार आहे़
-रशिद गावीत, शेतकरी सदस्य, बळीराजा कृषक मंडळ, धनराट ता. नवापूर
नवापूर तालुक्यात गटशेतीची चळवळ ही खोलवर रूजली आहे़ यामुळे शेतकºयांना चांगला मार्ग सापडला आहे़ शासनाकडून गटशेतीसाठी वेळावेळी निधी, मार्गदर्शन कार्यक्रम आणि शिवार भेटीचे आयोजन करण्यात येते़ यात नवापूर तालुक्यासाठी कार्यक्रम यशस्वीपणे राबवले जातात़ यंदाही शासनाकडून तालुक्यात उपक्रम सुरू आहेत -मधुकर पन्हाळे, प्रकल्प संचालक आत्मा, नंदुरबार