चांदसैली घाटात संरक्षक कठडय़ांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:58 PM2018-05-16T12:58:08+5:302018-05-16T12:58:08+5:30

कोठार ते धडगाव दरम्यानचा रस्ता : प्रवाशांचा जीव मुठीत घेवून प्रवास

Guardian cliffs in the Chandesaili valley | चांदसैली घाटात संरक्षक कठडय़ांची दुरवस्था

चांदसैली घाटात संरक्षक कठडय़ांची दुरवस्था

googlenewsNext

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 16 : सातपुडा पर्वतरांगेतील धडगाव ते कोठार दरम्यान असणा:या चांदसैली घाटात अनेक ठिकाणी रस्त्याची व संरक्षक कठडय़ांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे घाटातील वाट अधिकच बिकट ठरत असून, प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तीव्र चढाव व उतार, नागमोडी वळणे यामुळे सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात धोकेदायक घाट म्हणून चांदसैलीचा घाट ओळखला जातो. तळोद्याहून धडगांवकडे जातांना कोठारपासून पुढे घाटाला सुरूवात होते. नंदुरबारहून धडगांवला जाण्यासाठी चांदसैली घाट मार्गे अंतर कमी आहे. त्यामुळे बहुतेक वाहनधारक धडगांवला जाण्यासाठी चांदसैली घाटमार्गेच जाणे पसंत करतात. 
दिवसभर वाहनांची वर्दळ असणा:या या घाट मार्गात अनेक ठिकाणी रस्त्याची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता दरीच्या कडेला खचलेला आहे तर काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध भगदाड पडलेले आहेत. तीव्र चढाव व उतारामुळे रस्त्याच्या मधोमध असणारे हे भगदाड वाहधरकांच्या सहजासहजी लक्षात येत नाही. त्यामुळे अचानकपणे वाहने आदळली जात असल्याने अपघाताची शक्यता निर्माण असते. त्यामुळे संबंधित वरिष्ठांनी याकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
याशिवाय या घाटात सुमारे एक ते दोन वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या संरक्षक कठडय़ांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणच्या संरक्षक कठडय़ांवर वाहने आदळली गेल्याने त्यांचीदेखील दुरवस्था झाली आहे तर काही ठिकाणच्या संरक्षक कठडय़ांच्या खालील जमीन खचल्याने संरक्षक कठळे उन्मळून पडले आहेत.            रस्त्याची व संरक्षक कठडय़ाच्या दुरवस्थेने घाटातील प्रवास करतांना प्रवाश्यांचा जीव टांगणीलाच    असतो.
कोठारपासून पुढे धडगांवपर्यतच्या घाटातील रस्त्यात रस्ता दुरुस्ती व अन्य कामांसाठी  टाकण्यात आलेली खडी व मुरूम रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी वर्षभर तशीच पडलेली दिसून येते. घाटातील अरुंद रस्त्यावर खडी, मुरूम व रेती पसरत असल्यामुळे राहदारीस मोठय़ा प्रमाणात अडचणी निर्माण होतात. शिवाय त्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रकार देखील सातत्याने घडून    येतात.
चांदसैली घाटातील काही रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तळोदा उपविभागात तर काही रस्ता हा नंदुरबार उपविभागाच्या हद्दीत येतो. गेल्या अनेक वर्षापासून चांदसैली घाटातील रस्त्याची, संरक्षक कठडय़ांची दुरवस्था, संरक्षक कठडय़ांचा अभाव अश्या समस्या सातत्याने निर्माण होत आलेल्या आहेत. या समस्यांवर नेहमीच  तात्पुरती उपाययोजना करण्यात येते. मात्र कायमस्वरुपी उपाय केले जात नसल्यामुळे वर्षभर या घाटातून प्रवास करतांना प्रवाशांचा जीव टांगणीलाच असतो. वर्षभर विविध कारणांनी अपघातदेखील घडून येत असतात. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
 

Web Title: Guardian cliffs in the Chandesaili valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.