कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी ‘गुजरात बंदी’ची कठोर अंमलबजावणी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 12:45 PM2020-11-26T12:45:06+5:302020-11-26T12:47:02+5:30

n  रमाकांत पाटील     लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या कहर सद्या गुजरातमध्ये वाढत असल्याने त्याचा धोका सिमेवर असलेल्या ...

The Gujarat ban should be strictly enforced to prevent another wave of corona | कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी ‘गुजरात बंदी’ची कठोर अंमलबजावणी व्हावी

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी ‘गुजरात बंदी’ची कठोर अंमलबजावणी व्हावी

Next

n  रमाकांत पाटील
    लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या कहर सद्या गुजरातमध्ये वाढत असल्याने त्याचा धोका सिमेवर असलेल्या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यालाही वाढला आहे. त्यामुळे गुजरात बंदीची काही दिवस कठोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. 
नंदुरबार जिल्हा हा गुजरात आणि मध्यप्रदेशच्या सिमेवर आहे. सुरुवातीच्या काळात या जिल्ह्याने कोरोना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या होत्या. विशेषत: प्रशासनाबरोबर नागरिकही त्यात सहभागी झाले होते. राज्यांच्या सिमा रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी खास ग्राम रक्षक दलाची स्थापना केली होती. त्यामुळे राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यावरील सिमा तथा परजिल्ह्यांच्या सिमाही सील करण्यात आल्या होत्या. परिणामी महाराष्ट्रात अन्य जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना तब्बल दोन महिने जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण नव्हते. मात्र, पहिला रुग्ण आढळला तो गुजरातच्या मार्गेच आल्याचे प्रशासनाने त्यावेळी सांगितले होते.
आज आठ महिन्यांतर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण निश्चित वाढले, पण परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यात सहा हजार २४२ रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी पाच हजार ८४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. केवळ २४८ रुग्ण सद्या उपचार घेत आहेत. तर १५१ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. 
या पार्श्वभूमीवर गेल्या १५ दिवसांपासून नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. हे प्रमाण स्वॅब तपासणीच्या तुलनेत दहा टक्केच्याही आत आले आहे. अशा स्थितीत दिवाळीनंतर गेल्या आठवडाभरात गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सुरत, बडोदा, अहमदाबाद, राजकोट या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नवीन रुग्ण आढळून येत आहेत. विशेष म्हणजे या भागात नंदुरबार जिल्ह्यासह खान्देशातील लोकांचे प्रमाण मोठे आहे. गेल्या २० वर्षांपूर्वी गुजरातमध्ये प्लेगची साथ आली होती, एका ज्योतीषाने उकई धरण फुटण्याचे भाकित केले होते. त्यावेळी सुरतमधून खान्देशात लोकांचे लोंढेच्या लोंढे आले. एवढेच नव्हे तर गेल्या दहा वर्षात तापीला आलेल्या महापूराच्या वेळी देखील त्या भागातील लोक खान्देशात परतले होते. अशी स्थिती सद्या नसली तरी बहुतांश लोक गुजरातमधून विश्रांतीसाठी आपल्या मुळगावी येत असल्याचे प्रमाण गेल्या दोन दिवसांपासून दिसून येत आहे. प्रवासी रेल्वे बंद असल्याने एक्सप्रेस रेल्वेगाड्यात काही नागरिक येत आहेत. परंतु बहुतांश लोकं दुचाकी व चारचाकीने ग्रामिण मार्गातून येत असल्याचे चित्र आहे. 
प्रशासनाने सात ठिकाणी पोलीस दलामार्फत नाकाबंदी करणार आहेत. त्यात वाका चार रस्ता, केसरपाडा, कोरीट चौफुली, बेडीकीनाका, करोड-मरोड, देवापाटनाला, वडफळी, गव्हाळीनाका व डोडवा या ठिकाणांचा समावेश आहे. असे असले तरी इतरही छूपे मार्ग आहेत. त्यामुळे त्या रस्त्यांवरही बंदी करण्याची आवश्यकता आहे. विशेषत: त्यासाठी पूर्वीप्रमाणेच ग्राम सुरक्षा दलाची स्थापना केली तर प्रशासनासोबत लोकांचाही सहभाग वाढून निर्णयाची अंमलबजावणी करता येईल. 

सिमावर्ती रस्त्यांवर स्वॅब तपासणीची व्हावी
n महाराष्ट्र आणि गुजरात अर्थातच नंदुरबार जिल्ह्याचा संपर्क गुजरातशी मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक गावांचे व्यवहार तर एकमेकांशी जुळले आहेत. कारण गुजरात आणि महाराष्ट्राची सिमा एकमेकांमध्ये मिसळल्याने रोजच्या नागरिकांचा संपर्क आहे. अशा स्थितीत गुजरात बंदी निर्णयाची अंमलबजावणी करतांना काळजीपूर्वक नियोजन आवश्यक आहे. गुजरातमध्ये प्रवेश करतांना सुरत शहरात महाराष्ट्रातील कुठलेही वाहन गेल्यास त्यातील प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाते. त्यानंतरच शहरात प्रवेश दिला जातो. अशी काही उपाययोजना गुजरातमधून येणाऱ्या वाहन तपासणीसाठी करता येईल का? त्याचाही विचार होणे आवश्यक आहे.

Web Title: The Gujarat ban should be strictly enforced to prevent another wave of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.