गुजरात निवडणूक.. हर हर नर्मदे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 04:46 PM2017-11-14T16:46:12+5:302017-11-14T16:46:12+5:30
नर्मदा परिक्रमा : दिग्वीजयसिंह यांचे राजकीय मौन
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गुजरात विधानसभा निवडणुका ऐन रंगात आल्या असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार दिग्वीजयसिंह यांची नर्मदा परिक्रमा गुजरातमध्ये प्रवेश करणार असल्याने त्याबाबत सर्वानाच कुतूहल लागून आहे. यासंदर्भात दिग्वीजयसिंह यांना छेडले असता त्यांनी केवळ ‘हर हर नर्मदे..’ अशीच प्रतिक्रिया दिली.
दिग्वीजयसिंह हे गेल्या 30 सप्टेंबरपासून नर्मदा परिक्रमा करीत आहेत. 44 दिवस मध्य प्रदेशातील प्रवास केल्यानंतर सात दिवस ते महाराष्ट्रातून प्रवास करीत आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला गुजरातमध्ये ते प्रवेश करणार आहेत. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला असून या निवडणुका होईर्पयत त्यांचा मुक्काम गुजरातमध्येच परिक्रमानिमित्ताने राहणार आहे. त्यामुळे यासंदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी केवळ दोन्ही हात वर करून व स्मित हास्य करीत ‘हर हर नर्मदे..’ अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली.नव्हे तर नर्मदा नदीचे पौराणिक ऐतिहासीक महात्म्य तथा या परिक्रमेचे धार्मिक महत्व त्यांनी स्पष्ट केल़े त्यांची ही प्रतिक्रिया सुरु असतानाच त्यांच्यासोबत असलेले माजी खासदार रामेश्वर निखरा यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत़ ते म्हणाले, दिग्गीराजा नर्मदा परिक्रमानिमित्ताने मध्य प्रदेशात होते. त्या काळात तेथील शिवराजसिंह सरकारचे धाबे दणाणले होते. तसेच ते गुजरातमध्ये जातील तेव्हा भाजपमध्येही अशीच खळबळ होईल आणि या परिक्रमेच्या गुजरातमध्ये प्रवेशाने काँग्रेसमध्ये चैतन्य येईल, असेही सांगितले.
एकूणच आपल्या नर्मदा परिक्रमासंदर्भात दिग्वीजयसिंह यांनी पूर्णपणे राजकीय मौन बाळगले असले तरी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या राजकारण त्यात येत असल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हे तर मध्य प्रदेशातून येणारे काँग्रेसचे कार्यकर्तेही तेथील कुठल्या ना कुठल्या निवडणुकीसाठी मार्गदर्शन घेणारेही येत आहेत. काही तर चक्क आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी कोण चांगले राहणार याची चर्चा करण्यासाठी आल्याचे दिसून आले. दरम्यान, ही परिक्रमा सोमवारी उनपदेव, ता.शहादा येथे मुक्कामी होती. मंगळवारी त्यांचा प्रवास सातपुडय़ाच्या घाटातून सुरू झाला असून काकडदा, ता.धडगाव येथे त्यांचा मुक्काम राहणार आहे.