शिवरायांच्या जयजयकाराने दुमदुमली नंदनगरी
By admin | Published: March 15, 2017 11:47 PM2017-03-15T23:47:20+5:302017-03-15T23:47:20+5:30
एकत्रित मिरवणूक लक्षवेधी : चौकाचौकात अभिवादनाचा कार्यक्रम, डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई
नंदुरबार : शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे पोवाडे, गाण्यांच्या आवाजात आणि सायंकाळी निघालेल्या भव्य मिरवणुकीने शहर दणाणून गेले होते. शिवजयंतीनिमित्त सकाळपासूनच शहरातील चौकाचौकात उत्साह दिसून येत होता. भगव्या पताका, ङोंडे, कमानी यांनी चौक सजले होते. अनेक मंडळांनी शीतपेय वाटपासह इतर विविध सामाजिक उपक्रमदेखील घेतले.
तिथीनुसार शिवजयंती नंदुरबारात मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच नाटय़गृह आवारातील शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, पालिकेतील, कै.बटेसिंह रघुवंशी व्यापारी संकुल आणि पंचायत समिती आवारातील अर्धपूर्णाकृती पुतळ्यांना विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी अभिवादन केले.
चौक सजले
भगव्या पताका, ङोंडे यांच्यासह कमानींनी चौक सजले होते. चौकाचौकात छोटेसे व्यासपीठ उभारून त्यावर शिवरायांची प्रतिमा किंवा पुतळा ठेवून अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अशाच ठिकाणी काही संघटना, संस्थांनी शीतपेय वाटप व अन्नदानदेखील केले. युवकांमधील जोश ठिकठिकाणच्या कार्यक्रमांमध्ये दिसून येत होता.
ठिकठिकाणाहून मिरवणुका
शिवजयंतीच्या मिरवणुका शहरातील ठिकठिकाणच्या चौकातून दुपारी तीन वाजता निघाल्या. मुख्य मिरवणूक सायंकाळी पाच वाजता जुन्या पालिका इमारतीपासून निघाली. सजविलेल्या वाहनावर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व पुतळा ठेवण्यात आला होता. विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
पक्षांचे पदाधिकारी सहभागी
भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे, सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख दीपक गवते, रोहिदास पवार, हिरालाल मराठे, रवी पवार, उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, नगरसेवक दीपक दिघे, कुणाल वसावे, किरण रघुवंशी, विलास रघुवंशी, निखिल रघुवंशी, अजरुन सुधाकर मराठे, नीलेश चौधरी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख देवेंद्र जैन, गौरव चौधरी, नयन चौधरी, माजी नगरसेवक चारुदत्त कळवणकर, श्याम मराठे, राम रघुवंशी, पंडित माळी, छोटू माळी, आनंदा माळी आदी मिरवणुकीत सहभागी झाले होते.
प्रतिमा पूजन आणि अन्नदान
उड्डाणपुलाच्या शेजारी संभाजीनगरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त जयेश चौधरी यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी पिंटू हटकर, सचिन जाधव, अप्पा बाबर, चेतन सूळ, सचिन चेवंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सकाळी 10 वाजता याच ठिकाणी अन्नदान करण्यात आले.
सर्वच मंडळांकडून डीजे
मिरवणुकीत सहभागी सर्वच मंडळांचे कार्यकर्ते व शिवप्रेमी डीजेच्या तालावर थिरकले. यंदा जवळपास 15 पेक्षा अधिक डीजे लावण्यात आले होते. नंदुरबारातील मिरवणुकांचे मुख्य आकर्षण ढोल व ताशे यांच्या तालावर लेझीम असते. परंतु या वेळी ढोल-ताशे कुठेही दिसून आले नाहीत. केवळ डीजेंचाच निनाद होता.
गोफ नृत्य
महालक्ष्मीनगरातील नवयुवक व्यायामशाळेच्या युवकांनी मिरवणुकीत सांस्कृतिक कार्यक्रम आणि गोफ नृत्य सादर केले. सकाळी दहा वाजता संदीप चौडे, बिरूभाऊ बडंगर, आकाश फडके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी सोनू शिरसाठ, राहुल पाटील, रोहित साबळे आदी उपस्थित होते.
दुचाकींना ङोंडे
शहरातील अनेक शिवप्रेमींनी दुचाकींवर राजे शिवाजी यांच्या प्रमितेचे झेंडे लावलेले दिसून येत होते. मिरवणुकीत सामील झालेल्या युवकांनी डोक्यावर भगवे फेटे परिधान केलेले होते. अनेक युवक हातात भगवे झेंडे घेऊन शिवरायांचा जयघोष करत होते.
पोलिसांचा बंदोबस्त
सकाळपासूनच चौकाचौकात तसेच संवेदनशील भागात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. गस्ती पथकातील वाहनेदेखील गस्त घालत होते. सायंकाळच्या मुख्य मिरवणुकीत उपअधीक्षक, दोन पोलीस निरीक्षक व कर्मचारी मोठय़ा संख्येने तैनात करण्यात आले होते. वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीस निरीक्षक मोहकर व उपनिरीक्षक शेजवळ यांनी परिश्रम घेतले.