लग्नसराईत बाजारसह लघुव्यवसायला सुगीचे दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:23 AM2021-01-13T05:23:15+5:302021-01-13T05:23:15+5:30
लग्नसराईला सुरुवात झाल्याने म्युझिकल बॅन्ड, घोडे, मंडप, स्वयंपाक आचारी या व्यवसायांना चांगलीच मागणी वाढली आहे. टाळेबंदीमुळे खूप मोठा वर्ग ...
लग्नसराईला सुरुवात झाल्याने म्युझिकल बॅन्ड, घोडे, मंडप, स्वयंपाक आचारी या व्यवसायांना चांगलीच मागणी वाढली आहे. टाळेबंदीमुळे खूप मोठा वर्ग बेरोजगार झाला होता. मात्र आता उद्योग व्यवसाय सुरू झाल्यामुळे असंख्य कलाकार व कामगारांना रोजगार मिळू लागल्याने उपजीविकेचा प्रश्न तूर्त सुटला आहे. लग्नात म्युझिकल बॅन्डचा व पारंपरिक वाजंत्रीचा प्रामुख्याने वापर होतो, त्यामुळे वादन कलाकारांना रोजगार उपलब्ध होत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी मनोरंजन साधनांमध्ये बदल करावा लागत असल्याने गेल्या वर्षीचा खर्च भरून काढण्यासाठी वाजत्री कलाकारांकडून आकर्षक उपाययोजना करण्यात येत आहेत. मुझिकल बॅन्डचे २० हजार पासून ६० हजार रुपयेपर्यंत दराने मागणी होत आहे. लग्नसराईत व्यवसाय कमी अधिक प्रमाणात होत असला तरी व्यावसायिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असल्याने लघुउद्योगाला सुगीचे दिवस आले आहेत.
ग्रामीण भागातील लग्नसोहळा मंडपात करण्याची परंपरा असल्याने आकर्षक मंडपाला आधिक प्राध्यान्य दिले जात आहे. शहरी भागात गल्लीभोळात मंडप टाकण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने मंगलकार्यालयात लग्नसोहळा पार पाडण्यात येत आहेत. सध्या लग्नसोहळ्यासाठी कंत्राट दिले जात आहे. या कंत्राटमध्ये लग्नकार्यातील म्युझिकल बॅन्ड, घोडे, मंडप, भोजन, मंगल कार्यालय, फोटोग्राफी व व्हिडियोग्राफी अधिक बाबी दिल्या जात असल्याने कंत्राट घेणाऱ्या मंगलकार्यालय ला जास्त प्राधान्य दिले जात आहे.
लग्नाच्या वरातीत घोड्याची प्रमुख उपस्थिती असल्याने त्यांचे असाधारण महत्त्व आहे. लग्नातील वरातीला घोड्यांना पाच हजार ते सात हजारांपर्यंतची मागणी होत आहे. आकर्षक व नाचणाऱ्या घोड्यांना अधिक दराने मागणी होत आहे. बदलत्या काळानुसार घोड्यासोबत बग्गीला जास्त महत्त्व प्राप्त होत असल्याने गेल्या वर्षी लग्नसराईमध्ये बग्गीला मागणी कमी झाल्याने मालकांना बग्गीवरील खर्च सहन करावा लागला आहे. यंदा घोड्यासोबत बग्गीला कमी अधिक मागणी होत असल्याचे मालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
लग्नसोहळ्यात भोजनात चवीचे स्वादिष्ट पदार्थ केले जातात. भोजन तयार करण्यासाठी व वितरण करण्यासाठी आचारीला कार्यक्रमाचे कंत्राट दिले जाते. ग्रामीण भागात आचारी कडून भोजन तयार करण्याात येत असते. त्यामुळे आचारीसह कामगारांना रोजगार उपलब्ध होतो. किराणा दुकांनातून अन्नधान्याची खरेदी केली जात असून, अन्नधान्यासह भाजीपाला चांगली मागणी वाढली आहे.
गेल्या वर्षी लग्नसराई रद्द करण्यात आल्याने म्युझिकल यंत्रणेचा खर्च निघाला नाही, विविध समस्या निर्माण झाल्या होत्या, यंदा व्यवसाय चांगला चालू असल्याने लागलेला खर्च निघणार आहे.
- जगदीश शिरसाठ, बॅन्डमालक शनिमांडळ
गेल्या वर्षी लॅाकडाउन मुळे लग्नसराईला बंदी होती, मात्र यावर्षी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लग्न सोहळ्यात शासकीय नियमांचे पालन करण्यात येत असल्याने मंगल कार्यालय भवनाला चांगली मागणी आहे.
- संदीप चौधरी, मंगल कार्यालयमालक, नंदुरबार