जेलमधून सुटला आणि चोरीच्या गुन्ह्यात पुन्हा पोलीसांनी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 04:04 PM2021-01-06T16:04:48+5:302021-01-06T16:04:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जेलमधून सुटून बाहेर आल्यानंतर चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी केवळ चारच तासात पुन्हा बेड्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जेलमधून सुटून बाहेर आल्यानंतर चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी केवळ चारच तासात पुन्हा बेड्या ठोकल्याची घटना ३ जानेवारी रोजी घडली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताने यापूर्वी चोरीचे २० गुन्हे केले असून, यातील एका गुन्ह्यात शिक्षा भोगून तो शहरात परतला होता.
संतोष दिलीप तिजवीज, रा. बाहेरपुरा असे संशयिताचे नाव आहे. २ जानेवारी रोजी मध्यरात्री नंदुरबार शहरातील मंगळ बाजारात टिलूमल वेडूमल या किराणा दुकानाचे शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करत ५८ हजार रुपयांचा किराणा माल लंपास केल्याचे ३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आले होते. मंगळ बाजारात झालेल्या या चोरीच्या घटनेनंतर एलसीबीचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी पथकाची नियुक्ती करत चाैकशी सुरू केली होती. दरम्यान, जेलमधून नुकत्याच सुटून आलेल्या संतोष तिजवीज याच्यावर पथकाने पाळत ठेवली असता, त्यानेच चोरी केल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले असता, त्याने खोटे बोलून उडवाउडवीची उत्तरे दिली होती. एलसीबीचे पोलीस निरीक्षक राजपूत यांनी त्याची चाैकशी केल्यानंतर संतोष याने मंगळ बाजारात चोरी केल्याचे कबूल करत शहरातील सिटी पार्क भागात लपवून ठेवलेला ५८ हजार रुपयांचा किराणा माल काढून दिला. संतोष तिजवीज हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर नंदुरबार शहर व इतर पोलीस ठाण्यांमध्ये २० गुन्हे दाखल करण्यात आहेत. यातील एका गुन्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तो जेलमध्ये होता. जेलमधून सुटून परत आल्यानंतर काही तासात त्याने मंगळ बाजारातील दुकान फोडले होते. त्यानंतर अवघ्या चारच तासात मात्र त्याला बेड्या पडल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, पोलीस नाईक राकेश मोरे, दादाभाई मासूळ, पोलीस शिपाई अभय राजपूत, यशोदीप ओगले यांनी केली.