हृदयद्रावक! नवापुरात तिघांची आत्महत्या, मुलगा आणि सुनेचा मृतदेह पाहून पित्यानेही दिला रेल्वेखाली जीव
By भूषण.विजय.रामराजे | Published: May 23, 2023 06:53 PM2023-05-23T18:53:11+5:302023-05-23T18:53:36+5:30
Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील तीनटेंबा भागातील युवकाने पत्नीसह रेल्वेखाली उडी घेत, आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला.
- भूषण रामराजे
नंदुरबार - जिल्ह्यातील नवापूर शहरातील तीनटेंबा भागातील युवकाने पत्नीसह रेल्वेखाली उडी घेत, आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. वडिलांनी मोटारसायकल घेण्यास नकार दिल्याने त्याने हा निर्णय घेतला. तीन महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या मुलाने पत्नीसह आत्महत्या केल्याचे दिसून आल्यानंतर, पित्यानेही क्षणाचा विचार न करता, धावत्या रेल्वेत स्वत:ला झोकून दिल्याची ही घटना आहे. घटनेमुळे नवापूर परिसरासह नंदुरबार जिल्हा हादरला आहे.
सावन सय्यद गावित (२१), रोशनी सावन गावित (१९) आणि सय्यद कर्मा गावित (५०) अशी मयतांची नावे आहेत. शहरातील तीनटेंबा भागात रहिवासी असलेल्या रहिवासी सय्यद कर्मा गावित यांचा मुलगा सावन याने सोमवारी रात्री जेवण सुरू असताना नवीन मोटारसायकलीची मागणी केली होती. यावेळी सय्यद गावित यांनी मोटारसायकल घेण्यास नकार दिला होता. यातून घरात किरकोळ वाद झाला होता. हा वाद संपल्यावर सावन हा पत्नी रोशनी हिच्यासह घराबाहेर पडला होता. घराबाहेर पडल्यावर फुलफळी भागातील रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेखाली पत्नीसह उडी घेत, सावन याने जीवनयात्रा संपविली होती. रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराची माहिती सय्यद गावित यांना कळल्यावर त्यांनी फुलफळी भागात धाव घेतली होती. दरम्यान, या ठिकाणी मुलगा आणि सुनेचा मृतदेह पाहून भावनाविवश होत, त्यांनीही धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. हा प्रकार सय्यद यांच्या पत्नी सुमित्रा यांना कळल्यावर, त्यांनी एकच हंबरडा फोडला होता. घटनेची माहिती मिळाल्यावर, फुलफळी, तीनटेंबा, देवलफळीसह शहरातील नागरिकांनी रेल्वे रुळाकडे धाव घेतली होती.
माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ, जमादार युवराज परदेशी, विकी वाघ यांना घटनास्थळी धाव घेतली होती. तिघांच्या मृतदेहाचे नवापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.सय्यद गावित हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना चार मुली आणि सावन हा एकच मुलगा होता. फेब्रुवारी महिन्यात त्याचा विवाह देवलफळी भागातील रोशनी यांच्यासोबत झाला होता. संसार सुखाचा सुरू असताना, मुलाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सकाळी तिघांवर सामूहिकरीत्या अंत्यविधी करण्यात आला.