नंदुरबारात सोन्याचे दर सर्वाधिक

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: March 1, 2019 12:33 PM2019-03-01T12:33:47+5:302019-03-01T12:34:30+5:30

व्यापार : भांडवली बाजारात अस्थिरता, भारत-पाक युध्दजन्य परिस्थितीचा परिणाम

The highest rate of gold in Nandurbar | नंदुरबारात सोन्याचे दर सर्वाधिक

नंदुरबारात सोन्याचे दर सर्वाधिक

googlenewsNext

संतोष सूर्यवंशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भारत-पाकिस्तान सिमेवर निर्माण झालेल्या युध्दजन्य परिस्थितीमुळे व्यापार क्षेत्रात मोठी उलाढाल बघायला मिळत आहे़ सराफा बाजारात तेजी तर भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणात नकारात्मकता आहे़ खान्देशातील नंदुरबारात सोन्याच्या दरात सर्वाधिक तेजी दिसून येत आहे़ नंदुरबारात सोन्याचे भाव ३४ हजार रुपये प्रती दहा ग्रॅमपर्यंत जाऊन पोहचले आहेत़ तसेच चांदीदेखील किलो मागे ४१ हजार रुपयांपर्यंत गेली आहे़
भारत-पाक सिमेवर अशीच युध्दजन्य परिस्थिती राहिल्यास सोन्याच्या भावात अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ नंदुरबारच्या तुलनेत जळगावात प्रती १० ग्रॅम सोन्यामागे ३३ हजार ७०० व धुळ्यात ३३ हजार ३०० इतका भाव आहे़ त्यामुळे खान्देशात नंदुरबार येथे सोने सर्वाधिक महाग असल्याचे सांगण्यात आले आहे़ शेअर मार्केट मंदीत असला तरी नंदुरबार येथील सुवर्ण बाजार चांगलाच तेजीत बघायला मिळत आहे़ गुरुवारी सेंन्सेक्स व निफ्टीच्या निर्देशांकाता मोठ्या प्रमाणात चढ-उतार बघायला मिळाले़ गेल्या पंधरा दिवसांपासून हीच स्थिती कायम असल्याचे दिसून येत आहे़
रुपयाची स्थिती भक्कम होणार
भांडवली बाजारातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील काही महिन्यांमध्ये रुपयाची स्थिती अधिक भक्कम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ सध्या ७१ रुपयांच्या बरोबरीला १ डॉलर असे सूत्र आहे़ या आधीही ६६ रुपयांपर्यंत रुपयोचे ेअवमूल्यन झालेले होते़ त्या तुलनेत सध्या रुपया स्थिरावला असल्याचे सांगण्यात आले़ भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सर्व व्यवहार हे डॉलरच्या माध्यमातून होत असल्याने या कंपन्यांच्या दृष्टीने डॉलरची स्थिती मजबूत होणे व रुपयाचे अवमूल्यन होणे फायदेशीर ठरत असते़ सध्या रुपया स्थिर असल्याने बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून बाहेरील गुंतवणूक क्षेत्रांकडे अधिक लक्ष देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले़ भारत-पाकिस्तानात युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने परकीय गुंतवणूकदारांकडून आपले शेअरर्स तसेच भांडवली बाजारातील आपली भागिदारी इतरत्र वळविण्यात येत आहे़ त्यामुळे याचा थेट परिणाम आपल्या देशातील परकीय चलनावर होताना दिसून येत असतो़ त्यामुळे जोपर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवरील अस्थिरता दूर होत नाही तोपर्यंत भारतातील भांडवली बाजारपेठेत स्थिरता निर्माण होणार नाही़
भारतातील आगामी लोकसभा निवडणुका, भारत-पाकिस्तान संबंध तसेच अमेरिकेने अफगाणिस्तान येथून आपले सैन्य माघारी बोलावून तालिबानी संघटनांशी चर्चा करण्यासाठी टाकलेले पाऊल, अमेरिका व चीन या दोन मोठ्या देशांमध्ये व्यापारी कुरघोडी आदींमुळे व्यापार विश्वास मोठ्या प्रमाणात फेरबदल होत असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे परकीय गुंतवणूकदारांवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे़ १४ फेबु्रवारी रोजी जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सेन्सेंक्सच्या निर्देशांकात मोठी घसरण बघायला मिळत आहे़
तेव्हापासून तर आतापर्यत बाजारात अस्थिरता कायम आहे़ यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यास याचा फायदा भारतातील आयटी कंपन्यांना मिळणार आहे़ आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फटका शेअर मार्केटला बसला असला तरी सराफा बाजारात मात्र सर्व ठिकाणी झळाळी दिसून येत आहे़ साधारणत: लोकसभा निवडणुकीपर्यंत हीच स्थिती कायम राहणार असल्याचे सराफ बाजारातील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे़
केंद्र शासनाकडून सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातही व्यापारी वर्गाची निराशा झालेली आहे़ त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत भावात घसरण होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले़ दरम्यान, क्रुड आॅईलचे दर प्रती बॅरल साधारणत: ६० डॉलरपर्यंत गेले आहे़ त्यामुळे सोन्याच्या दरातही वाढ झालेली दिसून येत आहे़
४गुरुवारी सकाळी सव्वा नऊ वाजता सेन्सेक्स निर्देशांक ३६,०२५.७२ वर ओपन झाला होता़ संपूर्ण दिवस पडझड झाल्यानंतर दुपारअखेपर्यंत तो ३५,८६७.४४ वर स्थिरावल्याचे दिसून आले़
४बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सेन्सेक्समध्ये -३७.९९ म्हणजे साधारणत ०.११ टक्के इतकी घसरण दिसून आली़ दरम्यान, सुरुवातीला उसळलेला निफ्टी निर्देशांक बाजार बंद होताना गडगडल्याचे दिसून आले़
४बुधवारी १०,८०६.६५ वर बंद झालेला निफ्टी निर्देशांक गुरुवारी बाजाराची सुरुवात होताच १०,८६५.७० वर होता़ त्यानंतर दिवसभरात परदेशी गुंतवणूकदारांच्या बाजारातील उठाठेवीनंतर दुपारी साडेतीन वाजता निफ्टी निर्देशांक १०,७९२.५० पर्यंत खाली येत स्थिरावला़

Web Title: The highest rate of gold in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.