सातपुड्यातील होळी उत्सवाला सुरुवात; पहिली मानाची होळी पेटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2023 07:24 PM2023-03-03T19:24:30+5:302023-03-03T19:25:02+5:30
सातपुड्यातील होळी उत्सवाला सुरुवात झाली आहे.
रमाकांत पाटील
नंदुरबार: सातपुड्यातील मानाची होळी असलेली डाबचा (हेलो दाब)मोरी राही पाडा येथील देवाची होळी आज दिनांक 3 रोजी शुक्रवारी पहाटे पारंपारिक नृत्य करीत विधिवत पूजन करून पेटविण्यात आली. सर्वप्रथम मान असलेली ही होळी पेटल्यानंतर सातपुड्याच्या होलीकोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.
सातपुड्यातील ही मानाची देव होळी साजरी करण्यासाठी महाराष्ट्र गुजरात तसेच मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव उपस्थित होते. गुरुवारी सायंकाळपासूनच येथे पारंपारिक होळीची पाळणी अर्थात होळी साजरा करण्यासाठी पारंपारिक नियमांचे पालन करणाऱ्या विशिष्ट पारंपारिक वेशातील बावा, बुध्या, मोरखी,धानका,डोखा यांचे नृत्य सुरू झाले होते. या पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रमांनंतर पहाटे गाव पुजारींच्या हस्ते विधिवत पूजन करून देवाची होळी परंपरेनुसार चालत आलेल्या मानाप्रमाणे धनसिंग रूपसिंग पाडवी यांच्या हस्ते पेटविण्यात आली. डाब (मोरीराही) येथील हे देव होळी पेटल्यानंतर होळी आता सातपुड्यातील होली कोतवाला सूरुवात होणार आहे.
सातपुड्यात संपन्न होणाऱ्या होलिकोत्सवाच्या पाश्वभुमीवर नवस केलेच्या आदिवासी समुदायातील बांधवांकडून पाळणी सुरु करण्यात आली आहे .पादत्राणे न घालणे, खाटेवर न बसणे, सत्शील वर्तन ठेवणे, निंदा न करणे आदिम सह विविध नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. आरोग्य चांगले राहो, वरुण राजाची कृपादृष्टी होवो, चांगला पाऊस पडून शेती हिरवीगार होवो, धन,धान्य, वैभव. सुख,शांती,समृद्धी नांदावी यासाठी हा नवस केला जातो.
डाब (मोरीराहीपाडा) येथील होळी सर्वप्रथम आदिवासींचे दैवत असलेल्या राजा- फांटा, गांडा -ठाकोर यांनी सर्वप्रथम यांनी साजरी केली होती त्यानंतर होळी पेटवण्याच्या दुसरा मान राजांना देण्यात आला व तिसरा मान प्रत्येक गावातील पोलीस पाटील (वावा) यांना मिळालेला आहे. या होळीसाठी सातपुड्याच्या दुर्गम भागातील नागरिक डाब येथे बुधवारपासून दाखल झाले होते. याहामोगी देवीचे जन्मठिकाण असलेल्या देवगाई येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली. डाबच्या देवहोळीनंतर वालंबा, तोडीकुंड, काठी यासह ठिकठिकाणी होळी पेटणार आहे. यात जागोजागी मोरखी,बुध्या, बावा, धानका, डोखा हे गेर नृत्य आदिवासींकडून केले जाणार आहे.