होम क्वॉरंटाईन पोलिसाची ग्राम सुरक्षा दलाशी हुज्जत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 01:37 PM2020-04-26T13:37:47+5:302020-04-26T13:38:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : होम क्वॉरंटाईन असलेला पोलीस कर्मचारी विना मास्क बाहेर खरेदीसाठी निघाले असतांना त्यांना ग्राम सुरक्षा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : होम क्वॉरंटाईन असलेला पोलीस कर्मचारी विना मास्क बाहेर खरेदीसाठी निघाले असतांना त्यांना ग्राम सुरक्षा दलांनी हटकले असता त्यांच्याशी वाद घालून रस्त्यावर लावण्यात आलेले लाकूड व टायर फेकून दिल्याची घटना दुधाळे शिवारात घडली. पाच दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचा २४ रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
योगेश दगडू लोंढे, रा.दुधाळे शिवार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. दगडू लोंढे यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी घरातच राहणे आवश्यक असतांना १९ रोजी सायंकाळी सहा वाजता ते खरेदीसाठी घराबाहेर निघाले. निघतांना तोंडाला मास्क देखील लावला नाही. दुधाळे शिवारातील कोकणी हिल कमाणीजवळ त्यांना तेथील ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांनी अडविले असता त्यांनी त्यांच्याशी वाद घातला. अडथळा फेकून दिला. सरपंच सत्यप्रकाश माळसे हे तेथे आले असता त्यांच्याशी वाद घालून सरपंचांना हा अधिकार आहे का? अशी विचारणा केली. सरपंच सत्यप्रकाश माळसे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून २४ रोजी सायंकाळी उशीरा फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात योगेश लोंढे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास पोलीस निरिक्षक सुनील नंदवाळकर करीत आहे.