बेघरांना घरकुलांची प्रतिक्षा कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 11:14 AM2017-08-11T11:14:16+5:302017-08-11T11:17:07+5:30
876 घरकुलांचे काम पुर्ण : लाभार्थी निवड करून वाटप करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पालिकेच्या 876 घरकुलांच्या वाटपाची अद्यापही प्रतिक्षा लागून आहे. घरकुलांचे काम जवळपास पुर्ण झाले असून पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आतच त्यांचे वाटप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पालिकेने लाभार्थ्ीची यादी निश्चित करतांना काही निकष ठरविले आहेत.
नंदुरबारातील बेघर लोकांना घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी दीड हजार घरकुलांचा प्रस्ताव पालिकेने पाठविला होता. त्यापैकी 1176 घरकुले बांधकाम प्रस्तावीत होते. प्रत्यक्षात 876 घरकुलांना मंजुरी मिळून त्यासाठी अनुदान दाखल झाले होते. घरकुलांच्या बांधकामासाठी जिल्हा प्रशासनाने नंदुरबारातील जिल्हा रुग्णालयासमोरील जागा तसेच धुळे रस्त्यावरील भोणे फाटय़ानजीकची जागा दिली होती. त्या ठिकाणी चार मजली इमारतीत घरकुलांचे बांधकाम करण्यात आले. परंतु मध्यंतरी अर्थात दीड वर्षापूर्वी बेघर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली अनेकांनी या घरांचा ताबा घेतला होता. त्यामुळे पालिकेला मोठी कसरत करावी लागली होती.
पालिकेतर्फे यापूर्वी शहरातील फोटोपास धारक झोपडपट्टीवासीयांना घरकुलांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी तीन ते चार वेळा मुदतवाढही देण्यात आली. परंतू फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा:या कुटूंबाचे घर ज्या भागात असेल ती जागा पालिकेच्या ताब्यात द्यावी लागणार होती. शिवाय लाभार्थी हिस्सा म्हणून 10 ते 12 हजार रुपये देखील भरावे लागणार होते. त्यामुळे या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता.
घरकुलांचा ताबा
दिड वर्षापूर्वी जवळपास 800 जणांनी या घरकुलांचा ताबा घेतला होता. बेघर संघर्ष समितीने आपल्या यादीनुसारच लाभार्थ्ीची निवड करावी अशी मागणी केली होती. परंतु पालिकेने काही नियम व अटी लक्षात घेवून लाभार्थी निवड करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आपल्याला घरकुल मिळणार नाही असा समज करून अनेकांनी या घरकुलांचा ताबा घेतला होता. त्या ठिकाणी अनेक कुटूंबे जवळपास वर्षभर राहिली होती. पालिकेने पोलीस बळाचा वापर करूनही संबधीत कुटूंबे घरातून बाहेर निघाली नव्हती. अखेर जिल्हाधिका:यांनी मध्यस्थी करीत आणि पालिकेने पात्र लाभार्थ्ीनाच घरकुले दिली जातील असे जाहीर केल्यानंतर संबधीत कुटूंबे घरातून बाहेर निघाली आणि ताबा सोडला.
काम पुर्ण
जवळपास एक वर्ष अनेक कुटूंबांनी या घरकुलांचा ताबा घेतलेला होता. त्यामुळे अपुर्ण कामे पुर्ण करता येत नव्हती.
अखेर ताबा सोडल्यानंतर ठेकेदाराने तातडीने उर्वरित कामे पुर्ण केली. त्यात नळ फिटींग, किचन, लाईट फिटींग, रंगकाम आणि इतर कामांचा समावेश होता. ते आता पुर्ण करण्यात आले असून लवकरच ठेकेदार ही घरकुले पालिकेच्या ताब्यात देणार असल्याचे सांगण्यात आले.