आंतरराष्ट्रीय परिषदेत धडगाव परिसरातील युवकांच्या कार्याचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:32 AM2021-09-26T04:32:45+5:302021-09-26T04:32:45+5:30
नंदुरबार जिल्ह्यात १९९९ पासून जैवविविधता आणि कोरोनाकाळात जलसाक्षरता समितीच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाचे सादरीकरण या परिषदेत धडगाव ...
नंदुरबार जिल्ह्यात १९९९ पासून जैवविविधता आणि कोरोनाकाळात जलसाक्षरता समितीच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाचे सादरीकरण या परिषदेत धडगाव येथील प्राचार्य डॉ.एच.एम. पाटील यांनी केले. परिषदेत भविष्यात करावयाच्या कामांची चर्चा झाली. परंतु, भारतातील युवकांनी महाराष्ट्राच्या नंदुरबारसारख्या दुर्गम भागात केलेले शाश्वत कार्य सर्वांसाठी पथदर्शक असल्याचे परिषदेतील मान्यवरांनी गौरविले. सादरीकरणानंतर शेवटच्या दिवशी प्राचार्य डॉ. पाटील यांनी शाश्वत पर्यटनासाठीच्या बैठकीचे सत्राध्यक्षपद भूषवून परिषदेला या विषयीचा शाश्वत, व्यापक व दूरगामी असा दस्तऐवज तयार करून दिला. जल, जंगल, जमीन व सजीव यांच्या शाश्वततेसाठी युवकांचे कार्य व त्याची दिशा परिषदेत ठरली. त्यावर धडगाव परिसरातील युवक प्रत्यक्षात कार्य करीत आहेत, ही बाब सर्वांना प्रेरणादायी आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन युनेस्कोचे शाश्वतता राजदूत डॉ. शहाबाज खान (ऑस्ट्रेलिया) यांनी केले. या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदवल्याबद्दल आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमंत वळवी यांनी प्राचार्य डॉ. पाटील व जलसाक्षरता समितीचे कौतुक केले.