शहरात साडेपाच तास भारनियमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 09:55 AM2017-09-14T09:55:38+5:302017-09-14T09:55:38+5:30
ग्रामिण भागातही जनता हैराण : अनेक घटकांवार परिणाम, पिकांनाही फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरासह जिल्ह्यात भारनियमनाचा जाच सुरू झाला आहे. ऐन भाद्रपद हिटमध्येच नागरिकांना विजेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शहरी भागात किमान तीन ते साडेपाच तास भारनियमन केले जात आहे. एकाच वेळी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात भारनियमन न करता दिवसातून दोन टप्प्यात ते केले जात आहे. दरम्यान, ग्रामिण भागात पाच ते 11 तास भारनियमन सुरू असून यामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वीज वितरण कंपनीने गेल्या वर्षभरात भारनियमन जवळपास बंदच केले होते. ग्रामिण भागात मात्र पाच ते सात तास भारनियमन काही फिडरवरून सुरू होते. आता मात्र, विजेचा तुटवडा जाणवू लागल्याने आणि मागणी तसा पुरवठा होत नसल्यामुळे शहरीसह ग्रामिण भागातही मोठय़ा प्रमाणावर वीज भारनियमन सुरू करण्यात आले आहे. कुठलीही पूर्वसुचना न देता हे भारनियमन गेल्या तीन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे.
शहरी भागात साडेपाच तास
नंदुरबार शहरात एकुण आठ फिडर आहेत. त्यातील वीज चोरी आणि गळतीचे प्रमाण शिवाय वीज बील वसुलीचे प्रमाण याचा सरासरी विचार करून या फिडरांना ए.बी.सी. व डी. अशा कॅटेगरीत विभागण्यात आले आहे. नंदुरबारात ए. कॅटेगरीमध्ये एकही फिडर नाही तर बी. कॅटेगरीमध्ये एक, सी. मध्ये पाच तर डी. मध्ये दोन फिडर आहेत. यानुसार बी फिडरमध्ये किमान तीन तास भारनियमन केले जात आहे. सी कॅटेगरीमधील फिडरवरून पावणेचार तास तर डी कॅटेगरीमधील फिडरमधून साडेपाच तास वीज पुरवठा खंडित केला जात आहे.
एकाच वेळी भारनियमन न करता सकाळ व दुपार अशा दोन भागात भारनियमन केले जात आहे. त्यामुळे थोडाफार दिलासा मिळाला असला तरी डी कॅटेगरीच्या फिडरमधील नागरिकांना साडेपाच तास भारनियमनाच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे.
ग्रामिण भागातही..
ग्रामिण भागात देखील गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर भारनियमन केले जात आहे. किमान पाच व जास्तीत जास्त 11 तासांचे भारनियमन ग्रामिण भागात सहन करावे लागत आहे. अनेक भागात पावसाने ताण दिला आहे. त्यामुळे शेतक:यांना विहिर, कुपनलिकांद्वारे पाणी द्यावे लागत आहे. अशा वेळी वीजपुरवठा राहत नसल्यामुळे पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
अनेक समस्या
गेल्या वर्ष, दिड वर्षापासून शहरी भागात भारनियमन केले जात नव्हते. त्यामुळे अनेकांच्या इन्व्हर्टचा उपयोग होत नसल्यामुळे ते बंद किंवा बॅटरी डिस्चार्ज अवस्थेत होत्या. आता अचानक भारनियमन सुरू केल्यामुळे नादुरूस्त इन्व्हर्टर आणि बॅटरीमुळे अनेकांना अंधारात राहावे लागत आहे. विशेषत: शासकीय कार्यालयांमधील अशा प्रकारची स्थिती दिसून येत आहे.
वीज वितरण कंपनीच्या बसस्थानकासमोरील कार्यालयात बुधवारी दुपारी दोन ते चार वाजेच्या सुमारास विजेअभावी कर्मचा:यांना अंधारात काम करावे लागत असल्याचे चित्र होते. अशीच स्थिती इतर शासकीय कार्यालयांची होती. संगणकांची बॅटरी बॅकअप देखील कमी राहत असल्यामुळे कामकाजही ठप्प होत आहे. काही कार्यालयांमध्ये डिङोल जनरेटर असले तरी सध्या डिङोलचे भाव देखील वाढल्याने ते घेण्यासाठी तेवढी शासकीय तरतूद होत नसल्यामुळे अशा जनरेटरचाही फायदा होत नसल्याची स्थिती आहे.
ग्रामिण भागातील लहान, मोठय़ा उद्योगांना या भारनियमनाचा फटका बसत आहे.