नंदुरबारात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडय़ा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:10 PM2018-07-26T12:10:27+5:302018-07-26T12:10:41+5:30
नंदुरबारात खळबळ : लाखोंचा ऐवज लंपास, पोलिस सूस्त
नंदुरबार : शहरातील विविध भागात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी झाली. तिन्ही ठिकाणाहून लाखोंचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. या घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पहिली घटना देवचंदनगर भागात घडली. एलआयसी एजंट दुर्गेश दिलीप राठोड यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी चोरी केली. घरातील तीन लाख 91 हजार 700 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागीने व रोख रक्कमेचा त्यात समावेश आहे. सकाळी घटना उघडकीस आल्यावर पोलिसांना कळविण्यात आले. दुर्गेश राठोड यांनी फिर्याद दिल्याने शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक के.एस.पवार करीत आहे.
दुसरी घटना यशोधन पार्क, दुधाळे शिवार येथे घडली. संतोष गोविंदराव बिराजदार हे बाहेरगावी गेल्याने त्यांच्या बंद घराचा दरवाजाचे कुलूप तोडून चोरटय़ांनी चोरी केली. घरातील 63 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यात दोन तोळ्याचे मंगळसूत्र, सोन्याची अंगठी, कर्णफुले, चांदीची मुर्ती व हजार रुपये रोख असा एकुण 63 हजार 500 रुपयांचा ऐवजचा समावेश आहे. संतोष बिराजदार यांनी फिर्याद दिल्याने शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार सुनील बि:हाडे करीत आहे.
तिसरी घटना श्रीराम सोसायटीत घडली. कन्हैया लक्ष्मणदास झामनाणी यांच्याही बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी चोरी केली. 20 हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी चोरून नेला. उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार सैय्यद करीत आहे.