मुलांची कागदपत्रे घेऊन जाणाऱ्या पतीने पत्नीचा केला गळा चिरण्याचा प्रयत्न
By मनोज शेलार | Published: October 15, 2023 06:32 PM2023-10-15T18:32:46+5:302023-10-15T18:33:31+5:30
शनिवारी रात्री नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार : मुलाचे व मुलीचे आधारकार्ड व शाळेची कागदपत्रे घेऊन जाणाऱ्या पतीला पत्नीने टोकले असता रागाच्या भरात पतीने पत्नीवर चाकूने वार करून जबर जखमी केल्याची घटना नंदुरबारात शुक्रवारी सायंकाळी घडली. याबाबत शनिवारी रात्री नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनुसार, मूळचे थाळनेर, ता. शिरपूर येथील रहिवासी असलेले मराठे कुटुंबीय कामानिमित्त नंदुरबारात आले आहेत. मोठा मारुती मंदिरामागील संजय नगर भागात भाड्याने घेतलेल्या घरात ते राहतात.
शुक्रवारी सायंकाळी रवींद्र रामदास मराठे (४०) हे घरातील पिशवीत असलेले मुलाचे व मुलीचे आधारकार्ड आणि शाळेची कागदपत्रे घेऊन जात होते. त्यावेळी पत्नी संगीताबाई मराठे (३५) यांनी त्यांना याबाबत टोकले. कुठल्या कामासाठी कागदपत्रे घेऊन जात असल्याचे विचारल्याने रवींद्र यांना राग आला. त्यांनी रागाच्या भरात संगीताबाई यांच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत संगीताबाई मराठे यांनी फिर्याद दिल्याने पती रवींद्र मराठे यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार स्नेहदीप शिंदे करीत आहेत.