पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 11:56 AM2018-10-02T11:56:14+5:302018-10-02T11:56:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेतात काम करणा:या पत्नीवर चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी सेंधवान, ता.अक्कलकुवा येथील पतीला शहादा सत्र न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली.
गोरख विठ्ठल तडवी, रा.सेंधवान, ता.अक्कलकुवा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. घरगुती भांडणातून दारू पिऊन त्याने हा खून केला. या खटल्याची संक्षीप्त हकीकत अशी, 1 ऑक्टोबर 2016 रोजी द्वारकाबाई गोरख तडवी ही महिला शकीलाबाई सहादू तडवी, रुखमाबाई निमजी पाडवी, जहूबाई तारसिंग तडवी, खापरीबाई सोन्या तडवी सर्व रा.सेंधवान यांच्यासह गाव शिवारातील शेतात भात कापनीसाठी गेली होती.
शेतात काम करीत असतांना सकाळी दहा वाजेच्या सुमारास गोरख विठ्ठल तडवी हा तेथे चाकू घेवून आला. प}ीला काही समजण्याच्या आतच त्याने तिच्यावर चाकूने सपासप वार केले. महिलांनी आरडाओरड केली. महिला सोडविण्यासाठी गेल्या असता त्यांच्या मागे देखी गोरख तडवी याने त्यांच्यामागे चाकू घेवून धावला.
यावेळी आजूबाजूच्या शेतातील मजूर धावून येत असल्याचे पहाता गोरख तडवी याने तेथून पलायन केले. मजुरांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या द्वारकाबाई हिला तातडीने अक्कलकुवा ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मयत घोषीत केले.
याबाबत शकिलाबाई सहादू तडवी यांनी फिर्याद दिली. त्यावरून गोरख विठ्ठल तडवी याच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस निरिक्षक राजेंद्र भावसार, गणेश न्हायदे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. शहादा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात हा खटला चालला.
सर्व साक्षी पुरावे पहाता न्या. व्यास यांनी आरोपी गोरख तडवी यास जन्मठेपची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड.विनोद गोसावी यांनी काम पाहिले. पोलीस पैरवी अधिकारी म्हणून नासीरखाँ पठाण होते.
दरम्यान, मागील सहा दिवसात पाच गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली आहे. पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा सरकारी वकील सुशील पंडित यांनी संबधितांचे अभिनंदन केले.