दलित, आदिवासी, ओबीसी यांच्या आरक्षणाचा मी चौकीदार! जिवंत आहोत तोपर्यंत...: पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 06:48 AM2024-05-11T06:48:56+5:302024-05-11T06:49:14+5:30
पंतप्रधान मोदी यांची शुक्रवारी भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली.
- रमाकांत पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : देशातील दलित, आदिवासी, ओबीसींचे आरक्षण धर्माच्या आधारावर विभागणी करण्याचे काँग्रेसचे कारस्थान असून, त्याचे कर्नाटक मॉडेल देशात राबविण्याचा अजेंडा आहे; मात्र, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ते आपण होऊ देणार नाही. आरक्षणासाठी दलित, आदिवासी आणि ओबीसींचा चौकीदार म्हणून आपण काम करणार असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिली.
पंतप्रधान मोदी यांची शुक्रवारी भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल भाईदास पाटील, आमदार अमरीशभाई पटेल, भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्यासह धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
‘आस्था मिटविण्याचे काँग्रेसचे षडयंत्र’
मोदी यांनी यावेळी काँग्रेसला लक्ष्य केले. ते म्हणाले, काँग्रेस वेगवेगळ्या अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करीत आहे. हे लोक मोदींच्या विकासाशी सामना करूच शकत नाहीत. त्यामुळे त्यांना खोटा प्रचार करून मते मागावी लागत आहेत.
सॅम पित्रोदा यांचे नाव न घेता ते म्हणाले, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे गुरू देशातील जनतेला वर्णभेदाच्या नावावर विभागू पाहत आहेत. खरे म्हणजे ज्यांचा रंग भगवान श्रीकृष्णासारखा आहे अशा कृष्णवर्णीय लोकांना ते आाफ्रिकन मानतात.
अर्थात यातून ते आदिवासींचाही अपमान करीत आहेत. रामाच्या देशात राम मंदिर निर्माण आणि राम मंदिराचा उत्सव हे लोक देशद्रोह मानतात. काँग्रेस देशातून हिंदूंची आस्था मिटविण्याचे षडयंत्र करीत आहे. हे त्यांचे स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही.