तळोद्यात मातृपितृ पूजनाचा आदर्श सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 11:25 AM2019-02-12T11:25:34+5:302019-02-12T11:25:49+5:30
अनंत ज्ञानदीप आश्रमशाळेचा उपक्रम : प्रेम आणि आदराने भारावले अतिथीगण
तळोदा/कोठार : तळोदा तालुक्यातील कोठार येथील अनंत ज्ञानदीप अनुदानित आश्रमशाळेत सोमवारी आदिवासी विद्यार्थ्यांकडून मातृपितृ पूजन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपापल्या माता-पित्यांचे पूजन केले होते. विद्यार्थ्यांचे प्रेम आणि आदर पाहून उपस्थित पाहुणे व पालक भारावल्याचे चित्र दिसून आले.
संस्थेचे आधारस्तंभ स्व.जगन्नाथ त्र्यंबक वाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी ११ फेब्रुवारीला आश्रमशाळेतील विद्यार्थी मातृ-पितृ सोहळ्याचे आयोजन करतात. यंदाही हा सोहळा साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी अविनाश श्रिोडे तर प्रमुख पाहुणे म्हणून वाणी समाजाचे अध्यक्ष कैलास वाणी, योगेश दशपुते उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपापल्या माता-पित्यांचे परोहितांच्या मंत्रोपच्चाराने विधीवत पूजन केले. पाश्चात्य संस्कृतीच्या सद्या समाजावर मोठा पगडा बसत चालला असतांना या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या जन्मदात्यांचे पूजन करून आदिवासी संस्कृती बरोबरच भारतीय संस्कृतीचे जतन करीत असल्याचे पाहूण उपस्थितदेखील भारावले होते.
शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे त्यांनी कौतुकही केले होते. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना नॅशनल स्पेस सोसायटीचे स्पेस अंबेसेडर अविनाश शिरोडे यांनी सांगितले की, सध्या वातावरणाचा संपूर्ण समतोल बिघडत चालला आहे. कारण यंदा इतिहासात कधी नव्हे एवढा बर्फ पडला आहे. त्यामुळे तापमानदेखील प्रचंड खालावले होते. एका ठिकाणी ४५ डिग्री तापमान तर दुसऱ्या ठिकाणी मायनस तापमान असे विदारक चित्र सुद्धा पाहायला मिळाले. त्यामुळे आता भारताला अंतराळ विषयक शिक्षणाकडे वळायची गरज आहे. विद्यार्थ्यांनी ही या क्षेत्राकडे आपले करीयर करावे त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. पृथ्वीवरील संसाधन हळू हळू संपणार आहेत. त्यामुळे ही सर्व संसाधने अंतराळातून आणावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांनी या शिक्षणाकडे वळण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी कैलास वाणी, योगेश दशपुते, विश्वनाथ कलाल यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक संस्थाध्यक्ष डॉ.यांनी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अविनाश मराठे यांनी केले. व्यासपीठावर गोपाल केले, अनिल चितोडकर, आर.एस. वाणी, राजेश कोठावडे, नीलेश पुरकर, शामकांत कोतकर, शशीकांत येवले, राजेंद्र पाचतूत, जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण, राजेंद्र राजपूत, सुनील नेरकर, गजानन मालपुरे, गोविंद शिरोडे, महेंद्र सोनजे, आनंद सोनार, जितेंद्र दुबे, निसार मक्राणी, गुलाबराव चव्हाण, शरद मोराणकर, अमित कोठावडे आदींसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक सी.एम. पाटील, ज्ञानेश्वर पाटील, शिक्षक, कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.