संडे स्पेशल मुलाखत- अभिजीत पाटील यांचा राजकीय संकल्प संधी मिळाल्यास २०२२ ची निवडणूक पुन्हा लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 12:16 PM2020-12-06T12:16:16+5:302020-12-06T12:16:23+5:30
विधान परिषदेच्या या निवडणुकीत खूप शिकायला मिळाले. आपल्या कामाचा विस्तारही वाढला. धुळे आणि नंदुरबार दोन्ही जिल्ह्यातील प्रश्न समजून घेता आले. -अभिजीत पाटील.
रमाकांत पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे-नंदुरबार स्थानिक मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पराभव झाला असला तरी ही निवडणूक आपल्यासाठी खूप काही अनुभव, राजकीय डावपेच, दोन्ही जिल्ह्यातील समस्या, प्रश्न समजून घेण्यासाठी एक संधी मिळाली होती. त्यामुळे पराभव झाला असला तरी ही निवडणूक आपल्यासाठी आगामी निवडणुची रंगीत तालीम होती. त्यामुळे पक्षाने संधी दिल्यास जानेवारी २०२२ मध्ये होणाऱ्या या निवडणुकीत पुन्हा उमेदवारी करून विजय निश्चित मिळवेल असा दावा पोटनिवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार तथा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अभिजीत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना केला.
आपल्या या निवडणुकीतील पराभवाची कारणे काय?
ही निवडणुक जेंव्हा जाहीर झाली तेंव्हा उमेदवारी करायला कुणी पुढे येत नव्हते. एकतर केवळ अल्पकाळासाठी ही निवडणूक होणार होती शिवाय समोर भाजपचे भक्कम उमेदवार होते. या स्थितीत आपण निवडणूक लढविण्याची हिंमत केली. महाविकास आघाडीने आपल्याला अधिकृतपणे उमेदवार म्हणूनही घोषीत केले. मात्र, मध्यंतरी लॅाकडाऊनमुळे निवडणुकीबाबत अनिश्चितता निर्माण झाली. त्यामुळे प्रचारात काही त्रुटी राहिल्यात. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येही समन्वयात काही उणीवा रााहिल्या. पण कुणावरही आपला दोषारोप नाही. पराभवाची जबाबदारी स्वत:च स्विकारतो. कारण मी या निवडणुकीकडे मोठे व्यासपीठ म्हणून एक संधी म्हणून पाहिले. त्यातून खूप शिकता आले. कामाचा विस्तार वाढला. दोन्ही जिल्ह्यातील नेते, कार्यकर्ते यांच्याशी संपर्क आला. काही प्रश्न समजून घेता आले. हीच माझ्यासाठी जमेची बाजू आहे.
विदेशातील नोकरी सोडून सेवेसाठीच आलो
मी विदेशात उच्च सेवेच्या नोकरीवर होतो. परंतु आपल्या भागात लोकांची सेवा करता यावी यासाठी नोकरी सोडून स्थानिक राजकारणात आलो. जिल्हास्तरावर सेवेची संधी मिळाल्यानंतर त्याचा विस्तार वाढावा यासाठी विधानपरिषद निवडणूक लढविली.
पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे एकजूट नव्हती
या निवडणुकीत पश्चित महाराष्ट्रात ज्या प्रमाणे महाविकास आघाडीत एकजूट होती तशी एकजूट धुळे-नंदुरबार जिल्ह्यात नव्हती. त्यात काही उणीवा होत्या. ही एकजूट राहिली असती तर निश्चितच येथे वेगळे वातावरण राहिले असते. आघाडीचा नवीन संसार असल्याने तो घट्ट होण्यास काही कालावधी लागेल. पण पुढील निवडणुकीपर्यंत निश्चित ही एकजूट मजबूत होईल असा आपल्याला विश्वास आहे.