दोन दिवसात बिल भरले नाही, तर जिल्हा जाणार १०० वर्ष मागे
By भूषण.विजय.रामराजे | Published: March 30, 2023 04:53 PM2023-03-30T16:53:21+5:302023-03-30T16:54:07+5:30
सार्वजनिक पथदिवे, पाणी योजना यांची थकबाकी जमा करण्यासाठी निधी नसल्याने समस्या उद्भवण्याची चिन्हे आहेत.
नंदुरबार : येत्या दोन दिवसात जिल्ह्यात २ हजार पथदिव्यांचे बिल न भरल्यास नंदुरबार जिल्हा १०० मागे जाणार आहे. महावितरणची पथदिव्यांच्या बिलापोटी तब्बल २१९ कोटी रुपयांची थकबाकी असून ३१ मार्च ही रक्कम भरण्याची शेवटची मुदत आहे. ही रक्कम न भरल्यास जोडण्या कापण्यात येऊन वीज पुरवठा खंडीत होणार असून रस्त्यांवर अंधार पसरणार आहे.
सार्वजनिक पथदिवे, पाणी योजना यांची थकबाकी जमा करण्यासाठी निधी नसल्याने समस्या उद्भवण्याची चिन्हे आहेत. परिणामी २ एप्रिलनंतर काय असा प्रश्न आहे. पथदिव्यांचे कनेक्शन कट झाल्यास ग्रामीण आणि शहरी भागात १०० वर्षांपूर्वीच्या कंदीलांचा काळ येतो की, अशी चर्चा सध्या शासकीय यंत्रणांमध्ये सुरू आहे.
महावितरणची जिल्ह्यातील ८ हजार ४७८ ग्राहकांकडे २८४ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी आहे. यात पथदिव्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून १ हजार ८१८ पथदिव्यांच्या जोडण्या करण्यात आल्या आहेत. या पथदिव्यांची एकूण थकबाकी ही २१९ कोटी ६१ लाख रुपयांची आहे. गेल्या १० वर्षात ही थकीत रक्कम पूर्णपणे भरली गेली नसल्याने त्याच्या वाढ झाली आहे. पथदिव्यांमध्ये चाैकाचाैकात उभारण्यात आलेल्या उत्तुंग हायमस्टचाही समावेश आहे.