आश्रम शाळांचा निकाल कमी लागल्यास शिक्षकांच्या एक-दोन पगारवाढ रद्द
By मनोज शेलार | Published: August 20, 2023 06:17 PM2023-08-20T18:17:10+5:302023-08-20T18:17:53+5:30
शासकीय आदिवासी आश्रम शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी विभागातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत.
मनोज शेलार
नंदुरबार : शासकीय आदिवासी आश्रमशाळांमधील त्या त्या वर्गाचा निकाल कमी लागल्यास त्या शिक्षकांची एक किंवा दोन पगारवाढ रद्द करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी हा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी त्यास दुजोरा दिला आहे.
शासकीय आदिवासी आश्रम शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी विभागातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. परंतु, गुणवत्ता सुधारणा होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे आता थेट शिक्षकांनाच जबाबदार धरण्याचे धोरण आदिवासी विकास विभागाने ठरविले आहे. याबाबत माहिती देताना आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. ज्या वर्गाचा निकाल ५० टक्क्यांपेक्षा कमी लागेल त्या वर्गातील शिक्षकांची दोन इन्क्रीमेंट अर्थात पगारवाढ रद्द करण्यात येईल. ५० ते ८० टक्केपर्यंत निकाल लागल्यास एक पगारवाढ रद्द केली जाणार आहे.
याशिवाय गुणवत्ता सुधार उपक्रमांतर्गतच शिक्षकांची दर तीन ते सहा महिन्यात त्यांच्या विषयाची परीक्षा घेतली जाणार आहे. जे शिक्षक त्यात कमी पडतील, त्यांना प्रशिक्षित केले जाणार असल्याचेही डॉ. गावित यांनी सांगितले. दरम्यान, आश्रमशाळांची बदललेली वेळ कुठल्या परिस्थितीत पूर्वीप्रमाणे केली जाणार नाही. सर्व अभ्यास करूनच आश्रमशाळांच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे. शिक्षक संघटनांनी मोर्चा काढण्याच्या आणि आंदोलने करण्याचा इशारा दिला आहे. परंतु, आदिवासी विकास विभाग आपल्या निर्णयावर ठाम राहणार असल्याचेही आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.