पुलाजवळ अवैधरित्या गौणखनिजाचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 12:17 PM2020-12-01T12:17:00+5:302020-12-01T12:17:08+5:30

   लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा :  शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील पुलाजवळ जेसीबीने टेकडी फोडून अवैधरित्या गौणखनिज काढले जात आहे. ...

Illegal extraction of secondary minerals near the bridge | पुलाजवळ अवैधरित्या गौणखनिजाचा उपसा

पुलाजवळ अवैधरित्या गौणखनिजाचा उपसा

Next

   लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा :  शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील पुलाजवळ जेसीबीने टेकडी फोडून अवैधरित्या गौणखनिज काढले जात आहे. हे गौणखनिज मशिनरीने काढले जात असल्याने मोठ्या प्रमाणात कंपन होतो. त्यामुळे पूल व बॅरेजला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच गौणखनिज काढल्यामुळे मोठमोठे खड्डे पडून उत्तरेकडील भागात शेतात तापी नदीचे पाणी घुसून शेतपिकांचे नुकसान होणार आहे. महसूल विभागाने येथे होणारा अवैधरित्या गौणखनिजाचा उपसा बंद करून संबंधितांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील तापी नदीवरील पुलाच्या पायथ्याशी व बॅरेजपासून अवघ्या काही अंतरावरच अवैधरित्या जेसीबीद्वारे टेकडीचे खोदकाम करून  गौणखनिजाची बेसुमार वाहतूक सुरू आहे. वास्तविक नदीलगत, पुलालगत व बॅरेजलगत असे खोदकाम करता येत नाही, हा प्रकार नियमबाह्य असून त्यामुळे बॅरेज व पुलाला धोका निर्माण होऊ शकतो. नदीलगत ही टेकडी असल्याने उत्तरेकडील शेतांमध्ये नदीचे पाणी शिर नाही. त्यामुळे पिकांचे एकप्रकारे संरक्षण होते.  मात्र काही ठेकेदारांनी त्यांनी घेतलेल्या रस्ते व    इतर कामांसाठी परवानगी न घेता जेसीबीद्वारे थेट खोदकाम करून डंपरच्या डंपर भरून गौणखनिज उपसण्याचे उद्योग सुरू केले आहेत.   तापी नदीला पूर आला तर पाणी थेट उत्तरेकडील भागातील शेतात शिरुन शेतपिकांचे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होईल यात कोणतीही शंका नाही. 
गौणखनिज काढण्याआधी महसूल विभागाची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर संबंधित ठेकेदार कुठून गौणखनिज घेणार आहे याची नोंद केली जाते. गौणखनिजाची परवानगी देताना महसूल विभाग गौणखनिज काढल्यानंतर नुकसान होणार नाही याची पाहणी करुनच परवानगी देऊन तशा सूचनाही संबंधितांना देण्यात येतात. मात्र प्रकाशा येथे वेगळाच प्रकार सुरू आहे. याविषयी प्रकाशा येथील तलाठी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, गौणखनिजासाठी आता कोणालाही परवानगी दिलेली नाही, असे सांगितले. मग प्रकाशा येथील तापी नदीजवळ गौणखनिज का काढले जात आहे? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे. 
जर शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर मातीचा भराव करायचा असेल तर त्यांना रॉयल्टी भरावी लागते. रॉयल्टी भरली नाही तर दंडात्मक कारवाई केली जाते. मग  येथे अवैधरित्या गौणखनिजाचा उपसा करणाऱ्यांवर का कारवाई केली जात नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात असून येथून अवैधरित्या गौणखनिजाचा उपसा करणाऱ्यांचा महसूल विभागाने शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.

चौकशीची मागणी
कोळदा ते सेंधवा रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. ज्याठिकाणी काम अपूर्ण आहे अशा ठिकाणी भरावाचे काम सुरू आहे. तसेच प्रकाशा ते तोरणमाळ रस्त्याचेही  काम सुरू आहे. या रस्त्यावर मातीचा भराव करण्याचे काम सुरू आहे. या कामांसाठी ही टेकडी फोडण्याचे काम सुरू असल्याचे समजते. दोन्ही ठेकेदारांपैकी  गौणखनिजाचा उपसा कोण करीत आहे याचा संबंधित विभागाने शोध घ्यावा. की या दोन्हींपैकी अजून तिसरा कोणी आहे याचा तपास करून तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे. परवानगी दिली असेल तर जवळच पूल व बॅरेजला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. तसेच टेकडीमुळे शेतपिकांचे नदीतील पाण्यापासून होणारे संरक्षण हे मुद्दे संबंधित विभागाने विचारात का घेतले नाही, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. महसूल विभागाने भविष्यातील धोके व होणारे नुकसान लक्षात घेऊन येथे होणारा गौणखनिजाचा उपसा बंद करण्याची मागणी होत आहे. 

Web Title: Illegal extraction of secondary minerals near the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.