नवापाडात 37 लाखांचा अवैध दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:38 AM2018-12-21T11:38:19+5:302018-12-21T11:38:24+5:30
नवापूर : नाशिक येथील दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शहरानजीक नवापाडा येथे छापा टाकून 37 लाख रुपये किंमतीचा ...
नवापूर : नाशिक येथील दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शहरानजीक नवापाडा येथे छापा टाकून 37 लाख रुपये किंमतीचा दारु साठा जप्त केला आहे. तर नवापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 38 हजार रुपयांचा दारुसाठा जप्त करून एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही कारवाईंमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
20 वाहनातून सुमारे 150 अधिकारी व कर्मचा:यांचा ताफा गुरुवारी शहरातील देवळफळी भागातून औद्योगिक वसाहतमार्गे नवापाडाकडे दुपारी तीन वाजेच्या सुमारास रवाना झाल्याने एकच खळबळ उडाली. नवापाडा येथील एका बंद घरात मद्याचा साठा असल्याची गुप्त माहिती असल्याने पथकाने सरळ संशयित ठिकाणी छापा टाकला. तेथून 36 लाख 28 हजार 800 रुपये किमतीचे मॅजीक मोमेंट्स व्होडकाचे 750 मिलीचे 420 खोक्यांमधील पाच हजार 40 बाटल्या व 72 हजार रुपये किमतीच्या फ्लाइंग स्टार व्हिस्कीच्या 120 मिलीच्या 15 खोक्यांमधील 720 बाटल्या असा मद्यसाठा पथकाने ताब्यात घेतला. विभागीय उपआयुक्त, अधीक्षक, निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाचे वेगवेगळ्या जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचा:यांचा या पथकात समावेश होता. रात्री उशिरापावेतो ही कारवाई सुरु होती. एवढय़ा मोठय़ा संख्येने एवढी वाहने, अधिकारी व कर्मचारी दाखल झाल्याने परिसरात प्रचंड उत्सूकता निर्माण झाली होती. काय कारवाई होते. किती दारूसाठा सापडतो याबाबत उशीरार्पयत नागरिकांमध्ये कुतूहल कायम होते.
औद्योगिक वसाहत ते कोठडा मार्गावर दारु विक्री होत असल्याची गुप्त माहिती नवापूर पोलिसांना मिळाल्याने पोलीस पथकाने छापा टाकून अनिल अजरुन मोहिते यास मद्यसाठय़ासह ताब्यात घेतले.
घटनास्थळावरुन 38 हजार 400 रुपये किमतीचे रॉयल ब्लू व्हिस्कीच्या 180 मिलीच्या 40 खोक्यांमधील एक हजार 920 बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात पोलीस नाईक योगेश थोरात यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.