नवापूर तालुक्यातून अवैध लाकूड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 11:55 AM2021-01-02T11:55:44+5:302021-01-02T11:55:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील कोकणीपाडा गावात वन विभागाने छापा टाकून ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संशयित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : तालुक्यातील कोकणीपाडा गावात वन विभागाने छापा टाकून ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संशयित बोकरू रामसिंग कोकणी याच्याविरोधात वन गुन्हा दाखल आहे.
कोकणीपाडा गावात लाकडाचा कारखाना सुरू असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. यानुसार गुरुवारी धुळे येथील दक्ष्ता विभागाचे विभागीय वन अधिकारी, नंदुरबार येथील सहायक वनसंरक्षक, शहादा, नवापूर, चिंचपाडा, धडगाव, बिलगाव, तोरणमाळ, काकर्दा येथील वन परिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी कारखान्यावर छापा टाकला होता. यावेळी वनतस्कर बोकरू रामसिंग कोकणी याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली असता त्या ठिकाणी अवैधरित्या चालवण्यात येणारे रंधा मशीन आणि सागाचे लाकूड असा एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. हा जप्त केलेले लाकूड शासकीय विक्री आगार नवापूर येथे जमा करण्यात आला. या गुन्ह्याबाबत चिचंपाडा वनरक्षक यांनी गुन्हा दाखल केला आहे. पथकाने या ठिकाणाहून २२० नग साग लाकूड, एक रंधा मशीन इलेक्ट्रिक मोटारसह तीन डिझाईन मशीन, इलेक्ट्रिक मोटार असा एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नवापूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात असे अनेक अवैध लाकूड कटिंगचे कारखाने सुरू असल्याची माहिती समोर येत असल्याने कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.