नवापूरातून बेकादेशीरपणे साठा केलेला तांदूळ जप्त
By भूषण.विजय.रामराजे | Published: April 21, 2023 05:16 PM2023-04-21T17:16:03+5:302023-04-21T17:16:33+5:30
तांदूळाची किंमत २ लाख ७४ हजार रुपये एवढी आहे. प्रतिक्विंटल ७ हजार रुपये अशा दराचा हा तांदूळ आहे.
नंदुरबार : नवापूर शहरातील धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गालगत साठा करुन ठेवण्यात आलेला अवैध तांदूळाचा साठा पुरवठा विभागाने जप्त केला आहे. याप्रकरणी साठेबाजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूरातील महामार्गालगत गोडावूनमध्ये अवैधरितीने तांदूळ साठवून ठेवल्याची माहिती पुरवठा निरीक्षक दिलीप पाडवी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गोदामात छापा टाकला असता त्याठिकाणी १४० गोण्यांमध्ये तांदूळ भरलेला आढळून आला.
तांदूळाची किंमत २ लाख ७४ हजार रुपये एवढी आहे. प्रतिक्विंटल ७ हजार रुपये अशा दराचा हा तांदूळ आहे. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक दिलीप पाडवी यांनी नवापूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित मनोजकुमार रमेशचंद्र अग्रवाल (५०), गोपाल हुकुमचंद अग्रवाल (४५), राकेश हुकुमचंद अग्रवाल (४२) व कमलेश नाथूलाल अग्रवाल (४५) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळून आलेला तांदूळ हा काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्याच्या उद्देशाने साठा करुन ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आला आहे. पोलीसांनी सर्व तांदूळ साठा जप्त केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ करत आहेत.