विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व लायब्ररी तातडीने सुरू कराव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 11:12 AM2020-01-30T11:12:16+5:302020-01-30T11:12:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रत्येक आश्रम शाळेच्या आवारात तात्पुरते शेड उभारून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी व अभ्यासिका सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रत्येक आश्रम शाळेच्या आवारात तात्पुरते शेड उभारून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी व अभ्यासिका सुरू करावी अशा सुचना आदिवासी विकास मंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी बैठकीत दिल्या.
एकात्मिक आदिवासी विकास विभाग, नंदुरबार व तळोदा कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांचा आढावा आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. के. सी. पाडवी यांनी मंगळवारी सायंकाळी घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड. सिमा वळवी, प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, माजी मंत्री अॅड. पद्माकर वळवी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी एन. बी. साबळे, प्रदीप देसाई आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यानी प्रामुख्याने शिक्षण विभागाचा आढावा घेतला. ते म्हणाले, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांच्या आहारात पालेभाज्या फळे योग्य प्रमाणात देण्यात यावे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा यासाठी प्रत्येक शाळेच्या आवारात तात्पुरते शेड उभारुन त्वरीत लायब्ररी सुरु करावी, शिवाय त्या ठिकाणी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा अशा सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी संबंधितांना दिल्या.
सहाय्यक प्रकल्प अधिकारी एन.बी.साबळे यांनी शिक्षण विभागाची व देसाई यांनी विकासाच्या योजनांची माहिती यावेळी पालकमंत्र्यांना दिली. आढावा बैठकीत नंदुरबार व तळोदा प्रकल्प कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.