नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराने सहा महिन्यांत ३५९ बालकांचा मृत्यू
By मनोज शेलार | Published: January 10, 2024 06:06 PM2024-01-10T18:06:28+5:302024-01-10T18:06:43+5:30
जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३५९ बालक व २७ मातांचा मृत्यू झाला आहे.
नंदुरबार: जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३५९ बालक व २७ मातांचा मृत्यू झाला आहे. त्यातच अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधांमध्ये अळी आढळून आल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतरही दोन दिवस औषधांचे वाटप झाल्याचा आरोप आमश्या पाडवी यांनी केला आहे. आदिवासी बालकांच्या जिवाशी खेळणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही आमदार पाडवी यांनी पत्रकार परिषदेत केली.
नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ढिसाळ झाली आहे. वारंवार मागणी करूनही चौकशी केली जात नाही. कुपोषण व बालमृत्यूबाबत विधान परिषदेत आवाज उठवूनही आरोग्यमंत्री जिल्ह्यात येत नाही ही शोकांतिका आहे. सहा महिन्यांतील बालकांचा मृत्यू व माता मृत्यू ही चिंतेची बाब असल्याचे आमदार पाडवी यांनी सांगितले. खापर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लहान मुलांच्या औषधांमध्ये अळ्या निघाल्या असल्याच्या धक्कादायक प्रकार घडला आहे. ६ जानेवारी रोजी सदरचा प्रकार घडल्यानंतरही संबंधित आरोग्य केंद्रात औषधांचे वाटप सुरूच होते. संबंधित कर्मचाऱ्यांनी औषधे वाटप थांबविणे अपेक्षित असताना बालकांच्या जिवाशी खेळ करण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रत्येक आरोग्य केंद्राला २०० प्रमाणे औषधे बाटल्यांचा पुरवठा झाल्याचे आ. पाडवी यांनी म्हटले आहे.