सातपुड्यात शासकीय अनास्थेचा ‘कळस’; गर्भवती मातेच्या प्रसूतीला आडोसा झाला ‘पळस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2023 06:15 PM2023-07-05T18:15:28+5:302023-07-05T18:15:37+5:30
किलाबाई बिज्या वसावे यांनी पळसाच्या झाडाच्या आडोशाला महिलेची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला होता. भरदुपारी जोखीम पत्करून दायी बोंडीबाई आणि किलाबाई यांनी महिलेची जंगलात यशस्वी प्रसूती केली.
किशोर मराठे
वाण्याविहीर : सातपुड्यात रस्त्याअभावी रुग्णालयात झोळी अर्थात बांबूलन्समधून नेण्यात येणाऱ्या गर्भवती मातेला कळा अनावर झाल्याने तिची प्रसूती पळसाच्या झाडाच्या आडोशाला झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला आहे. अक्कलकुवा तालुक्यातील बोडीपाडा येथील ही माता असून बोडीपाडा ते दसरापादर असा तीन किलोमीटरचा रस्ता नसल्याने तिची प्रसूती झाडाखाली करण्याची वेळ कुटुंबीयांवर आली.
वंतीबाई आबला वसावे असे मातेचे नाव आहे. वंतीबाई ह्या बोडीपाडा येथील रहिवासी असून मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना झोळी करून पती आबला वसावे हे गावातील युवक आणि नातेवाईक महिलांच्या मदतीने दसरापादर येथे आणत होते. दरम्यान, आंबाबारी गावाजवळ जंगलात मातेला प्रसवकळा अनावर झाल्या होत्या. यातून पती आबला राशा वसावे व सोबत दायी बोंडीबाई रावजी तडवी, किलाबाई बिज्या वसावे यांनी पळसाच्या झाडाच्या आडोशाला महिलेची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला होता. भरदुपारी जोखीम पत्करून दायी बोंडीबाई आणि किलाबाई यांनी महिलेची जंगलात यशस्वी प्रसूती केली.
प्रसूतीनंतर बाळासह झोळीतून प्रवास
प्रसूतीनंतर वंतीबाईचे पती आबला वसावे व गावातील वनसिग मिठ्या वसावे,अंगणवाडी सेविका मोगराबाई वनसिंग वसावे, जान्या रावजी तडवी, कालुसिंग बावजा तडवी, कालुसिंग दोहऱ्या वसावे यांनी ब्रिटिश अंकुशविहिर, ता. अक्कलकुवा येथे संपर्क दसरापादरपर्यंत रुग्णवाहिका बोलावली होती. या रुग्णवाहिकेपर्यंतचे तीन किलोमीटर अंतर हे महिलेने बाळासाह पुन्हा झोळीतून कापले. दुपारी चार वाजता महिला दसरापादर येथे पोहोचल्यानंतर तेथून तिला अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील बोडीपाडा ते दसरापादर मेनरोड तीन किलोमीटर रस्ता नाही. यामुळे येथील नागरिक पायपीट करत दसरापादरपर्यंत जातात. सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील कौलवीमाळ ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बोडीपाडा येथपर्यंत रस्ता तयार करण्यासाठी पाठपुरावा करूनही शासन आणि प्रशासन लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांना जिल्हा निर्मितीच्या २५ वर्षांनंतरही साधे आरोग्य केंद्रात जाण्यासाठी झोळी (बांबूलन्स) करावी लागत आहे.