पश्चिम घाट आगीच्या विळख्यात, जंगलात वनवा पेटला; मध्यरात्रीपर्यंत आग विझवण्यासाठी प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 04:07 PM2023-04-12T16:07:03+5:302023-04-12T16:07:54+5:30
घटनास्थळी रात्री नवापूर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी वनमजूर व परिसरातील ग्रामस्थ आग विझवण्यासाठी जंगलात रवाना झाले.
- रमाकांत पाटील
नंदुरबार : नवापूर शहरातील उत्तर भागात असलेल्या पश्चिम घाटाच्या जंगलात काल रात्रीपासून वनवा पेटत असल्याचे दृश्य दिसत होते.
धगधगता वनवा पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. यासंदर्भात वन्यप्रेमींनी वनविभागाला संपर्क केल्यानंतर वनविभागाला जाग आली. घटनास्थळी रात्री नवापूर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी वनमजूर व परिसरातील ग्रामस्थ आग विझवण्यासाठी जंगलात रवाना झाले.
डोंगराच्या एका बाजूची आग काही तासातच नियंत्रणात आणली परंतु दुसऱ्या बाजूला जामतलावचा परिसरातील जंगलात आग मध्यरात्रीपर्यंत धगधगत होती.या आगीमुळे पश्चिम घाटातील दुर्मिळ वनौषधी, वनस्पती,जैवविविधता धोक्यात आल्याची परिस्थिती आहे.या संदर्भात वनविभागाने लक्ष देणे गरजेचे आहे आग कशामुळे लागते याचा देखील शोध वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावा.
पश्चिम घाट हा जगातील आठ जैवविविधता हॉटस्पॉटपैकी एक आहे. पश्चिम घाटाची सुरुवात नवापूर पासून ते थेट कन्याकुमारी पर्यंत आहे. पश्चिम घाटातील या जंगलात काल आग लागली आणि वणवा पसरला. वन विभाग व ग्रामस्थ सातत्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही आग विझवण्यासाठी दूर्गम भाग, तीव्र वारे आणि उच्च तापमानामुळे आग विझवण्यात अडथळे निर्माण झाले आहेत.
आगीत कोणत्याही प्रचाराचे नुकसान न झाल्याचा दावा वनविभागाने केला आहे.आगीत फक्त कोरडा चारा व गवत जळत असते असे वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल यांनी सांगितले. जंगलात पुन्हा आग लागू नये यासाठी वनविभागाने नियोजन करणे गरजेचे आहे अन्यथा मौल्यवान वनस्पती,दुर्मिळ वनौषधी,जैवविविधता नष्ट होईल वनविभागाच्या अधिकाऱ्याने देखील नवापूरच्या जंगलात लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.