दर एक दिवसाआड घडतेय जिल्ह्यात वाहन चोरीची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:34 AM2021-09-23T04:34:29+5:302021-09-23T04:34:29+5:30
नंदुरबार : शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. महिनाभरात सरासरी किमान १५ दिवस वाहन चोरीच्या घटना घडत ...
नंदुरबार : शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. महिनाभरात सरासरी किमान १५ दिवस वाहन चोरीच्या घटना घडत असल्याचे चित्र आहे. पोलीस वेळोवेळी चोरट्यांना जेरबंद करून त्यांच्याकडून वाहन जप्तही करतात, तरीही चोरीच्या घटना थांबत नसल्यामुळे पोलीसही हैराण झाले आहेत.
नंदुरबार जिल्ह्याची भौगोलिक रचना लक्षात घेता दुचाकी चोरट्यांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात सहज पसार होता येते. त्यामुळे दुचाकी चोरीच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एक दिवसाआड किमान एक दुचाकी चोरीची घटना घडते. दुचाकीसह आता मोठ्या वाहनांकडेही चोरट्यांनी मोर्चा वळविला आहे. गेल्या सहा महिन्यांत ट्रक, डम्पर, पाण्याचे टॅंकर चोरीच्या घटना घडलेल्या आहेत.
स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेने आतापर्यंत दुचाकी चोरट्यांना जेरबंद केले आहे. शहरी भागासह थेट सातपुड्यातील दुर्गम भागातील दुचाकी चोरटे निष्पन्न झालेेले आहेत. त्यांच्याकडून आतापर्यंत वेगवेगळ्या गुन्ह्यांत २०० पेक्षा अधिक दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. असे असतानाही चोरीचे सत्र थांबत का नाही, हा प्रश्न मात्र कायम आहे.
बसस्थानक परिसर...
बसस्थानक परिसरात पे-पार्कची सुविधा नाही. त्यामुळे नातेवाइकांना बसस्थानकात सोडण्यासाठी आलेले, परिसरातील व्यापारी संकुलांमध्ये खरेदीसाठी आलेले नागरिक बसस्थानकातील मोकळ्या जागेत किंवा समोरील डीएसके व्यापारी संकुलासमोरील मोकळ्या जागेत वाहने उभी करतात. अशा ठिकाणाहून वाहने चोरीस जातात. त्यामुळे या परिसरात किंवा बसस्थानकातच पे-पार्कची सुविधा उपलब्ध केल्यास दुचाकी चोरीच्या घटनांना आळा बसू शकतो.
मंगळ बाजार
नंदुरबारातील मंगळ बाजारात पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे नागरिक मिळेल त्या जागेवर वाहन लावत असतात. चोरटे नेमके तीच संधी साधत वाहने लंपास करतात. बाजाराच्या दिवशी हे प्रकार हमखास घडतात.
नवीन वसाहती...
शहरालगत असलेल्या नवीन वसाहतींमध्ये देखील दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरटे सहज लंपास करतात. जर रात्रीच्या वेळी पोलिसांनी पेट्रोलिंग वाढविली, तर अशा घटनांना आळा बसू शकतो. याशिवाय हाॅटेल्स, बार यांच्या परिसरातून देखील अनेक वेळा दुचाकी लंपास झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
२०० पेक्षा अधिक वाहने जप्त...
वाहन चोरीच्या जेवढ्या घटना घडत आहेत, त्या प्रमाणात स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखा किंवा त्या त्या पोलीस ठाण्यांना चोरट्यांचा शोध घेण्यातही यश येत आहे. त्यातूनच आतापर्यंत २०० पेक्षा अधिक दुचाकी जप्त करण्यात येऊन त्यातील काही मूळ मालकांना परत देखील दिल्या गेल्या आहेत. काही आंतरराज्य, तर काही पर जिल्ह्यांतील चोरटेदेखील त्यात आहेत.
अलर्ट सिस्टीम बसवा!
वाहने पार्क करताना शक्यतो आपण लॉक करतो. चावीशिवाय हे लॉक उघडून वाहने चोरी करून नेली जातात; पण जर अलर्ट सिस्टीम वाहनात असेल, तर चावीशिवाय लॉक उघडण्याचा अथवा तोडण्याचा प्रयत्न झाल्यास त्यातून मोठा आवाज येईल. याची माहिती वाहनधारकाला मिळेल. तसेच वाहनात जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईस बसवू शकतात.
सीसीटीव्ही कॅमेरा असल्याची खात्री करा
nआपण ज्या ठिकाणी आपले वाहने पार्क करतो, त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा असल्याची खात्री करावी. सोसायटीच्या पार्किंगमध्ये वाहने पार्क करताना आपली वाहने सीसीटीव्हीच्या निगराणीखाली राहतील याची खबरदारी घ्यावी.
nपार्किंगमध्ये उभे करताना किंवा वाहन आपल्या नजरेआड असेल त्यावेळी वाहनाच्या लॉकसोबत आणखी एखादे अतिरिक्त लॉक बसवावे. साखळीने बांधून त्याला कुलूप लावता येईल.