अनावश्यक बॅरीकेटिंगमुळे गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 08:22 PM2020-04-25T20:22:09+5:302020-04-25T20:22:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरात कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर प्रशासनाच्यावतीने कन्टेनमेंट झोन आणि बफर झोन सील करण्यात आले ...

Inconvenience due to unnecessary obstructions | अनावश्यक बॅरीकेटिंगमुळे गैरसोय

अनावश्यक बॅरीकेटिंगमुळे गैरसोय

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरात कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर प्रशासनाच्यावतीने कन्टेनमेंट झोन आणि बफर झोन सील करण्यात आले आहेत. अनेक वसाहतींमध्ये नागरिकांनी नियमबाह्यरित्या रस्ते वाहतुकीसाठी बंद केले असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने नागरिकांनी नियमबाह्यरित्या बंद केलेले रस्ते व अडथळे वाहतुकीसाठी खुले करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे व पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये कोरणा विषाणू संक्रमित आई व तिचा मुलगा निष्पन्न झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असले तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण भागात आणि शहरी भागात दोन्ही ठिकाणी बाहेरच्या माणसाला बंदी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात ग्रामसुरक्षा दल व पदाधिकारी हे गावाच्या सर्व सीमांवर तैनात झाले आहेत. यामुळेदेखील ग्रामीण भागात अडकलेल्या वृद्धांच्या आणि रुग्णांच्या औषधोपचाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर शहरी भागात अनेक ठिकाणी वसाहतीतील रस्ते रहिवाशांनी अनाधिकाराने बंद केले आहेत. याचा परिणाम म्हणून शहरी भागात गेले दोन दिवस दूध आणि इंधन, गॅससह जीवनावश्यक वस्तू पुरवणाऱ्या दुकानदारांना आणि व्यावसायिकांना अडचण निर्माण झाली आहे.
यासंदर्भात कुलकर्णी रुग्णालयाच्या डॉ.मालविका कुलकर्णी यांनी एका व्हिडिओद्वारे प्रशासनापर्यंत आपली तक्रार पोहोचवलेली आहे. गुरुवारी स्थानिक प्रशासनाला याच पद्धतीने एका गरोदर मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले. यामुळे प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, पालिका मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ यांनी नगरसेवकांच्या माध्यमातून शहरवासीयांना आवाहन केले आहे. ग्रामीण भागातील वृद्ध आणि रुग्ण यांच्या औषध उपचारांमध्ये सहकार्य करण्यासाठी योग्य ती व्यवस्था निर्माण करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तर शहरी भागात नगरसेवकांनी नको त्या ठिकाणी असलेली नियमबाह्य बॅरीकेटिंग दूर करून नागरिकांना सहकार्य करण्यासाठी त्यांचे प्रबोधन करावे अन्यथा पालिकेमार्फत हे अडथळे दूर करण्यासाठी अनावश्यक शक्ती, वेळ व मनुष्यबळ खर्च करावे लागणार आहे. कोरोनाविरुद्धचे युद्ध आपणा सर्वांना जिंकण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावे, असेही आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


 

Web Title: Inconvenience due to unnecessary obstructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.