एक मीटर भूजल वाढीने यंदा सुकाळ शहरे व खेड्यातून बाद होणार दुष्काळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 12:51 PM2020-12-02T12:51:39+5:302020-12-02T12:52:11+5:30
भूषण रामराजे लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वर्षभर कोरोनाच्या भीतीत जगणाऱ्या जिल्हावासीयांना यंदा पाणीटंचाई भोगावी लागणार नसल्याचा निर्वाळा भूजल ...
भूषण रामराजे
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वर्षभर कोरोनाच्या भीतीत जगणाऱ्या जिल्हावासीयांना यंदा पाणीटंचाई भोगावी लागणार नसल्याचा निर्वाळा भूजल सर्वेक्षण विभागाने दिला आहे. विभागाने ऑक्टोबर अखेरीस केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्याची भूजल पातळी ३ मीटरवर स्थिर असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा भूजल पातळी एक मीटरने वाढली आहे. यामुळे जिल्ह्यात उन्हाळ्यात पाणीटंचाई भेडसावणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मुसळधार पाऊस पडूनही जिल्ह्यातील भूजल पातळीत घट येत असल्याने २०१८ पर्यंत जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यातील विविध भागात गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होत होती. परंतु गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात पावसाने दिलेली १०० टक्के हजेरी व जलसंधारणाची कामे यामुळे गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत एक मीटर भूजल स्थिर असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. विभागाने नंदुरबार तालुक्यातील १३, नवापूर १५, तळोदा ३, शहादा ९, अक्कलकुवा ६ तर धडगाव तालुक्यातील ४ ठिकाणी विहिरी अधिग्रहीत करून त्यांचे सर्वेक्षण केले होते. यातून सप्टेंबर अखेरीस जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यात ३.०७ मीटर, नवापूर २.१३, तळोदा ५.५७, शहादा ५.०७, अक्कलकुवा ३.५७ तर धडगाव तालुक्यात १.८० मीटरवर भूजल पातळी स्थिर असल्याचे समोर आले आहे. विभागाने निर्धारित केलेल्या ५० पैकी केवळ १४ विहिरींच्या पाणी पातळीत सर्वेक्षणादरम्यान घट आल्याचे, तर विहिरींची पातळी वाढल्याचे समोर आले होते. आजअखेरीस जिल्ह्यात भूजल पातळी ही १.१६ मीटरने वाढली असल्याची माहिती आहे.
जिल्ह्याची भूजल पातळी एकमीटरने वाढली असल्याने चांगले संकेत मिळाले आहेत. जिल्ह्यात उदरात मुबलक पाणीसाठा आहे. परंतू या पाण्याचा योग्य पद्धतीने उपसा करणे गरजेचे आहे. यामुळे हे पाणी येत्या काळात टिकेल. जिल्ह्यात झालेली जलसंधारणाची कामे आणि पावसाचे पाणी जमिनीत गेल्याने पाणी पातळी वाढली आहे. नागरीकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. जिल्ह्यात यंदा पाणीटंचाई राहणार नाही.
-आर.ओ.भगमार, उपसंचालक, भूजल सर्वेक्षण विभाग, नंदुरबार.