दिवाळीत शिक्षक व बाहेरगावच्या नागरीकांमुळे वाढल्या कोविड टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 11:54 AM2020-11-22T11:54:52+5:302020-11-22T11:55:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दिवाळी काळात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली असल्याने चिंताही वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दिवाळी काळात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली असल्याने चिंताही वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोविड टेस्ट करणा-यांची संख्या वाढली आहे. यात प्रामुख्याने बाहेरगावाहून परलेल्या नागरीकांसह शाळेत सोमवारपासून हजर होणारे शिक्षकही आहेत.
२३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याने दिवाळीत मूूळगावी गेलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी करुन घेण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १३८ माध्यमिक शाळांमध्ये ज्ञानदानाचे काम करणा-या १ हजार ८९३ शिक्षक व शिक्षिका तसेच ६८५ शिक्षकेतर कर्मचारी यांच्या तपासण्या करण्याचे काम गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. यातून १ हजार १११ शिक्षकांच्या तपासण्या पूर्ण करुन अहवाल देण्यात आले आहेत. यातील केवळ २० जणांनाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती समाेर आली आहे. पाचवी ते आठवीच्या आणि नववी ते बारावीच्या वर्गासाठी काम करणा-या शिक्षकांकडून स्वॅब देण्यासाठी सध्या धावपळ सुरू आहे. यातील बरेच जण हे दिवाळीत गावी गेले होते. तेथून ते परत येवून स्वॅब देत आहेत. दुसरीकडे शिक्षक व कर्मचाा-यांसोबतच बाहेरगावाहून पुन्हा घरी परतलेल्यांकडूनही स्वॅब देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे दिवसेंदिवस स्वॅब कलेक्टींग सेंटरवर गर्दी वाढत असल्याचे दिसून आले आहे. दिवाळीत पुणे मुंबईसह परराज्यातून परतलेले स्वेच्छेने स्वॅब देत असल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आरटीपीसीआर लॅबमध्ये दिवसभरात १४० पेक्षा अधिक स्वॅबची तपासणी करण्यात येत आहे.
नंदुरबार शहरात शाळा क्रमांक एक आणि जिल्हा रुग्णालयाच्या आवारात स्वॅब घेतले जातात. याठिकाणी गेल्या चार दिवसांपासून गर्दी आहे. बाहेरगावी गेलेले शिक्षक, त्यांचे कुटूंबिय यांच्यासोबत बाहेरगावाहून आलेले नागरीक स्वॅब देताना दिसून आले.
आरोग्य विभागाकडून कोविड टेस्टींग सेंटरवर होणारी गर्दी टाळण्यासाठी शाळा निहाय चाचण्या करण्यावर भर देण्यात येत आहे. यातून गर्दी कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात पाच हजार शिक्षक असून यातील बहुतांश हे बाहेरगावचे रहिवासी आहेत. दिवाळीत ते गावी गेले होते.