नंदुरबार नगरपालिकेत महिला राजचा वाढता टक्का आशादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 11:54 AM2017-12-01T11:54:35+5:302017-12-01T11:54:48+5:30
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अर्थात 50 टक्के प्रतिनिधित्वाची संधी मिळाली असल्याने त्याचा पुरेपूर उपयोग महिलावर्ग करून घेत असल्याचे चित्र आहे. नंदुरबार पालिकेत गेल्या पंचवार्षीकपासून महिला आरक्षीत जागेपेक्षा अधीक जागांवर महिलांचे राज राहत आहे. या निवडणुकीत देखील महिलांसाठी 20 जागा राखीव असतांना तब्बल 55 महिला उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत.
महिला देखील पुरूषांच्या बरोबरीने व्यापार, उद्योग, नोकरी, समाजकारणासह राजकारणातही आघाडीवर असल्याचे सप्रमाण वेळोवेळी सिद्ध देखील झाले आहे. लोकसभेत अद्याप महिला विधेयक पास झालेले नाही. त्याला अनेक कारणे असतीलही परंतु स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण मिळाल्याने त्याचा पुरेपूर उपयोग महिलावर्ग करून घेत असल्याचे दिसून येत आहे. नंदुरबार पालिकेत गेल्या पंचवार्षिकपासून याचा अनुभव येत आहे. यंदा देखील 20 जागांसाठी तब्बल 55 महिला उमेदवार आपले भाग्य अजमावीत आहेत.
33 वरून 50 टक्के
पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण होते. नंतर ते 50 टक्के करण्यात आले. त्यामुळे महिलांचा सत्तेतील वाटा निम्मे झाला. परिणामी सर्वच क्षेत्रातील महिलांच्या अपेक्षा वाढल्या. यंदा नगरपालिका निवडणुकीत हे चित्र प्रकर्षाने पहावयास मिळाले आहे.
यंदा नगरसेवकपदाच्या एकुण 39 जागा आहेत. त्यातील 20 जागा या विविध प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षीत आहेत. या 20 जागांसाठी यंदा एकुण 55 महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्थात एका जागेसाठी सरासरी तीन इतक्या महिला उमेदवारांचा समावेश आहे. सर्वाधिक पाच महिला उमेदवारांची संख्या ही प्रभाग क्रमांक तीन मध्ये आहे.
विद्यमान नगरसेविका
विद्यमान नगरसेविकांमध्ये र}ा रघुवंशी या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. याशिवाय कश्मिरा बोरसे, शिलाबाई कडोसे, भारतीबाई अशोक राजपूत, कलावतीबाई वरत्या पाडवी यांचा समावेश आहे. याशिवाय काही माजी नगरसेविका महिला देखील यंदा निवडणूक रिंगणात आहेत.
दोन पंचवार्षिकची स्थिती
2007 च्या निवडणुकीत एकुण 12 महिला सदस्या निवडून आल्या होत्या. त्यावेळी 33 टक्के आरक्षण होते, त्यानंतर 50 टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर गेल्या पंचवार्षिकमध्ये निम्मे जागा आरक्षीत करण्यात आल्या. त्यानुसार 19 जागा असतांना 23 महिला नगरसेविका निवडून आल्या. 37 नगरसेवकांपैकी 23 महिला नगरसेविका होत्या. यंदा देखील महिला नगरसेविकांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त राहणार आहे.
हस्तक्षेपक कमी
महिला नगरसेविका किंवा पदाधिका:यांच्या पतींचा त्यांच्या कामात हस्तक्षेप जास्त राहत असल्याचा नेहमीच आरोप होत असतो. परंतु असे हस्तक्षेप आता कमी होऊ लागले असल्याचे गेल्या काही वर्षातील स्थिती आहे. निवडून आलेल्या सर्वच महिला सदस्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराची माहिती करून देण्यासाठी प्रशिक्षणाचीही तेवढीच आवश्यकता आहे.