तीन फीडरद्वारे होणार स्वतंत्र वीजपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:09 PM2018-06-05T13:09:40+5:302018-06-05T13:09:40+5:30
तळोद्यात काम अंतिम टप्य्यात : खंडित पुरवठय़ाची समस्या कमी होणार, नागरिकांना दिलासा
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 5 : वीज वितरण कंपनीच्या येथील कार्यालयाशेजारी उभारलेल्या 33 के.व्ही. केंद्रातील तीन स्वतंत्र फीडरच्या विभागणीच काम हाती घेतले असून यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात स्वतंत्र वीजपुरवठा होणार आहे. साहजिकच खंडित वीजपुरवठय़ाची कटकट कमी होवून जवळपास साडेचार हजार ग्राहकांना दिलासा मिळेल. मात्र आता पावसाळ्यापूर्वी त्याचे काम पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
शहरातील चार हजार 600 वीज ग्राहकांना घरगुती व व्यावसायिक वीजपुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी वीज वितरण कंपनीने आपल्या कार्यालयालगतच 33 के.व्ही. उपकेंद्र उभारले आहे. परंतु या केंद्रावर केवळ पाच एम.व्ही. क्षमतेचा ट्रान्सफार्मर बसविल्यामुळे ग्राहकांना सतत तांत्रिक बिघाडाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे वीजपुरवठादेखील खंडित होत असे. या पाश्र्वभूमीवर शहरातील वीजपुरवठा स्वतंत्र करण्याची मागणी केली जात होती. या अनुषंगाने येथील कार्यालयाकडून जिल्हा विकास नियोजन समितीकडे 2016 मध्ये प्रस्ताव पाठविण्यात आला होता. साधारण दीड कोटींचा हा प्रस्ताव होता. हा प्रस्ताव यंदा मंजूर होऊन त्याचे काम कंपनीने हाती घेतले आहे. तीन स्वतंत्र फीडरचे काम सुरु आहे. शहादा रोडकडील भागासाठी पाच एम.व्ही., कार्यालयाच्या भागाकडे 10 एम.व्ही. तर उर्वरित भागसाठी 10 एम.व्ही. अशी विभागणी करण्यात आली आहे. यामुळे आता स्वतंत्र वीजपुरवठा केला जाणार आहे. शिवाय तांत्रिक बिघाड व सततच्या खंडित वीजपुरवठय़ापासून ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. कारण पूर्वी एका ठिकाणी जरी तांत्रिक बिघाड झाला तरी दुरूस्तीसाठी संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित करावा लागत असे. त्याचबरोबर कंपनीच्या अधिकारी, कर्मचा:यांना नाहक जनतेच्या रोषाला बळी पडावे लागत होते. आता सर्वानाच यातून दिलासा मिळणार आहे. मात्र पावसाळ्यापूर्वी त्याचे काम पूर्ण करून सुरळीत वीजपुरवठा मिळावा, अशी ग्राहकांची मागणी आहे.