दुष्काळ निवारणासाठी भारतीय जैन संघटनेने घेतला पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:52 PM2018-04-29T12:52:43+5:302018-04-29T12:52:43+5:30
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 29 : दुष्काळ निवारणासाठी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेतला असून नंदुरबार जिल्ह्यातही संघटनेचे काम सुरू आह़े जिल्ह्यातील गावांनी आपल्या गावात पाण्यासाठी जेवढे काम करता येईल, तेवढे करा, त्यासाठी संघटनेतर्फे जेसीबी व पोकलेन मशिन विनामुल्य उपलब्ध केले जाईल असे आश्वासन भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी येथे दिल़े जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात झालेल्या सभेत ते बोलत होत़े
जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांच्या प्रतिनिधींची सभा बीजेएसचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी येथे झाली़ यावेळी आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ़मल्लीनाथ कलशेट्टी, उपजिल्हाधिकारी अर्चना पठारे, बीजेएसचे जिल्हाध्यक्ष डॉ़ कांतीलाल टाटिया, जिल्हापरिषद सदस्य किरसिंग वसावे, संजय चव्हाण, तहसीलदार नितीन पाटील, शहाद्याचे तहसीलदार मनोज खैरनार, अनिल भामरे, नंदकुमार सांखला, रमेश कांकरिया, अनिल चोरडिया यांच्यासह वॉटर कप स्पर्धेत सहभागी ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होत़े
यावेळी बोलताना शांतीलाल मुथा यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यात यापूर्वी शैक्षणिक चळवळीत योगदान दिले आह़े यात 2 तालुक्यात मूल्यवर्धन उपक्रम राबवला जात आह़े बीजेएसच्या माध्यमातून काही वर्षापूर्वी बीड जिल्ह्यात गाळ काढण्याची कामे सुरू केली होती़ यासाठी तेथे राहिलो होतो़ तब्बल 20 लाख क्यूबेक्स गाळ काढून तो शेतात दिला होता़ आज बीड जिल्ह्यात 37 टक्के पाणीसाठा शिल्लक आह़े दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी पाणी फाउंडेशनने सुरू केलेले प्रयत्न हे कौतुकास्पद आहेत़ अभिनेते आमिर खान यांच्या प्रेरणेने प्रारंभी राज्यात 3 आणि नंतर 30 तालुक्यात वॉटर कप स्पर्धा सुरू झाली़ यातून तेथील गावे जलयुक्त झाली आहेत़ या गावांमध्ये राज्यातील ग्रामस्थांना ट्रेनिंग दिले जात आह़े आजघडीस राज्यातील 75 तालुक्यातील साडेपाच हजार गावांमध्ये ही चळवळ सुरू आह़े यातील 24 तालुके हे दुष्काळग्रस्त आहेत़
नंदुरबार जिल्ह्यात बीजेएस कडून 100 तास जेसीबी आणि 250 तास पोकलेन मोफत देण्यात आले आहेत़ येथील गावांचा उत्साह पाहता कोणत्याही अटीविना त्यांना जेसीबी देण्यात येतील़ गावांमध्ये जेवढी क्षमता तेवढे यंत्रांचा वापर करा, दुष्काळ निवारणासाठी बीजेएस मदतीकरिता मागेपुढे पाहणार नाही़ असेही त्यांनी ठामपणे सांगितल़े
जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी नंदुरबार तालुक्यातील 46 आणि शहादा तालुक्यातील 48 गावांमधील वॉटर कप स्पर्धेचा आढावा घेत ग्रामसेवकांना सूचना केल्या़ यावेळी त्यांनी 1 मे रोजी महाश्रमदान कार्यक्रमाची माहितीही उपस्थितांना दिली़
आमदार डॉ़ विजयकुमार गावीत यांनी लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम भारतीय जैन संघटना आणि पाणी फाउंडेशन करत आह़े लोकांनी यात पूर्णपणे सहभाग दिल्यास गावांमधील पाण्याची समस्या मिटेल असे सांगितल़े