सात शाळांमध्ये पोलिसांकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:35 PM2018-03-25T12:35:37+5:302018-03-25T12:35:37+5:30

बोगस लेटरपॅड व शिक्के : कागदपत्रांबाबत शाळाही अनभिज्ञ

Inquiry from the police in seven schools | सात शाळांमध्ये पोलिसांकडून चौकशी

सात शाळांमध्ये पोलिसांकडून चौकशी

Next

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 25 : जिल्हा परिषदेत अपंग युनिटअंतर्गत बोगस शिक्षक प्रकरणी पोलिसांना विविध धागेदोरे मिळू लागले आहेत. अटक करण्यात आलेल्या 12 शिक्षकांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी शहादा तालुक्यातील सहा तर चाळीसगाव तालुक्यातील एका शाळेत चौकशी केली असून काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. 
दरम्यान, दोन शिक्षणाधिकारी व चार कर्मचा:यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 3 एप्रिलला उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे.
जिल्हा परिषदेत बोगस अपंग युनिट दाखवून 71 जणांना संशयीतरित्या नियुक्ती देण्यात आली होती. चौकशीअंती त्यातील 31 जणांवर फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतार्पयत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 12 शिक्षकांना अटक केली आहे. हे सर्व शिक्षक अद्यापही कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी ठिकठिकाणी तपासाला सुरुवात केली आहे. या तपासादरम्यान पोलिसांना अनेक धक्कादायक बाबी आढळून येत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती किती खोलवर आहे याचा अंदाज पोलिसांना येवू लागला आहे. 
शाळांची तपासणी
अटक करण्यात आलेल्या शिक्षकांनी कशी नियुक्ती मिळविली याची माहिती मिळवून प्रकरणाचे तपास अधिकारी ठिकठिकाणच्या शाळांमध्ये जावून कागदपत्रांची तपासणी आणि संबधितांचे जाबजबाब घेत आहेत.
चार दिवसांपूर्वी तपासी पथकातील पोलीस उपनिरिक्षक संदीप पाटील यांनी चाळीसगाव तालुक्यतील बोरदेबुद्रूक येथील जिल्हा परिषद शाळेत जावून तपासणी केली. तेथे यापूर्वी कधीही अपंग युनिट दाखविण्यात आलेले नसल्याचे तेथील शिक्षकांनी जबाब दिले. त्यांना दाखविण्यात आलेली शाळेची कागदपत्रे व शिक्के देखील नकली असल्याचे शाळेतील संबधितांनी सांगितल्याचे समजते.
शनिवारी तपासी पथक पुन्हा शहादा तालुक्यातील सहा शाळांमध्ये गेले होते. तेथे देखील अनेक धक्कादायक कागदपत्रे व जबाब त्यांच्या हाती लागले. पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, लंगडी भवानी, नवानगर, शहाणा, ओझर्टा, डोंगरगाव व जावदे येथील शाळांमध्ये पोलिसांनी चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार या सर्व शाळांमधील      मुख्याध्यापक व शिक्षकांनी अशा प्रकारचे अपंग युनिट आमच्या शाळेत कधीही नव्हते व कुणीही शिक्षक अशा युनिटमध्ये कार्यरत नसल्याचा जबाब लिहून दिला. याशिवाय पोलिसांनी त्यांना त्या त्या शाळेची जी कागदपत्रे दाखविली ती देखील बोगस असल्याचे लिहून देण्यात आले  आहे. 
सूत्रधार शहादा तालुक्यातीलच
या शाळांच्या नावे बोगस कागदपत्रे तयार  करून देणारा सूत्रधार हा शहादा तालुक्यातीलच असल्याचे बोलले जात आहे. अटक करण्यात आलेल्या शिक्षकांनी देखील त्याचे नाव    सांगितलेले आहे. त्यामुळे आता पोलीस संबधित सूत्रधारांर्पयत कधी पोहचणार याकडे लक्ष लागून आहे.
बोगस लेटरपॅड व शिक्के
संबधीत शाळांच्या नावे बोगस कागदपत्रांसह शाळांचे लेटरपॅड, शिक्के व तत्कालीन मुख्याध्यापकांच्या नावाच्या सह्या देखील करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे काहीही संबध नसतांना अशा मुख्याध्यापकांना आता चौकशीला सामोरे जावे लागत आहे.
 

Web Title: Inquiry from the police in seven schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.