नंदुरबारातील श्रॉफ विद्यालयात पहिल्या क्लायमेट क्लॉकची स्थापना
By मनोज.आत्माराम.शेलार | Published: August 11, 2023 08:56 PM2023-08-11T20:56:56+5:302023-08-11T20:57:54+5:30
क्लायमेट क्लॉक एक काउंटडाऊन घड्याळ आहे.
नंदुरबार : येथील श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे जिल्ह्यातल्या पहिल्या क्लायमेट क्लॉकची स्थापना करण्यात आली. अटल लॅबच्या माध्यमातून ते तयार करण्यात आले असून दिल्ली येथील जी-२० इव्हेंटच्या उपक्रमात देखील ते सादर करण्यात आले होते.
दिल्ली येथे जी-२० इव्हेंटच्या वर्ल्ड लार्जेस्ट ग्लोबल क्लॉक असेंबली अँड डिस्प्ले कार्यक्रमात सोलर मन ऑफ इंडिया प्रोफेसर चेतन सोलंकी यांच्या मार्गदर्शनाने बनविले गेले. शाळेचा विद्यार्थी प्रसन्न दाऊतखाने व अटल लॅब प्रमुख राजेंद्र मराठे यांनी बनवलेल्या १.५°C क्लायमेट क्लॉकची स्थापना शाळेच्या प्राचार्या सुषमा शाह यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
क्लायमेट क्लॉक एक काउंटडाऊन घड्याळ आहे. यामध्ये जागतिक तापमान १.५°C वाढीपूर्वी आपल्या हातात शिल्लक असलेला वेळ हा वर्ष, दिवस, तास, मिनिटे व सेकंद या स्वरूपात दाखविते. पृथ्वीचे तापमान १.५°C ने वाढल्यास मोठे हवामानाचे संकट उद्भवणार आहे. पृथ्वीवर उष्णता, वादळे, पूर, गारपीट मोठ्या प्रमाणावर होईल. ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे हिमालय व अंटार्टिका खंडावरील हिमनग वितळल्यास समुद्राच्या पाण्याची वाढ होऊन मुंबई, चेन्नईसारख्या किनारपट्टीवरील शेकडो शहरांना मोठा धोका निर्माण होणार आहे.
यासाठी मानव जातीने सावध होण्याचा, डोळे उघडण्याचा व वेळ संपत चालली असल्याचा गंभीर इशारा क्लायमेट क्लॉक देत आहे. खूप उशीर होण्याआधी लगेच सुधारात्मक कृती सुरू करून पर्यावरणाचे रक्षण करण्याची व सतर्क होण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या विविध उपक्रमात शाळा नेहमीच अग्रेसर असते, याचाच एक भाग म्हणून ऊर्जा साक्षरता अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल यावेळी शाळेला एनर्जी स्वराज फाउंडेशनतर्फे प्रमाणपत्र मिळाले. कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्या सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षिका विद्या सिसोदीया, पर्यवेक्षक जगदीश पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.